राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात जागा व मनुष्यबळ; तंत्रज्ञान हस्तांतर, प्रशिक्षण आणि कोकणातील समस्यांवर उपाययोजनांना चालना
AKRUTI Center Konkan उभारणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबव (देवरूख) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बार्क) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. परमाणू ऊर्जा विभागाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत होणारा हा करार आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित समारंभात दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पूर्णत्वास गेला.
कोकण विभागातील हे पहिलेच ‘आकृती’ केंद्र आंबव येथे सुरू होत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून बार्ककडून विकसित तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतर आणि कौशल्य विकास यांना प्रोत्साहन व सहकार्य मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
AKRUTI Center Konkan साठी मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
या कराराच्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे सीईओ प्रद्युम्न माने, बार्कच्या वैज्ञानिक अधिकारी-वर्ग जी भारती भालेराव, डॉ. एस. पी. मेहेत्रे, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, राजेंद्र माने पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे आणि मीनाताई ठाकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. व्ही. नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना भारती भालेराव यांनी स्पष्ट केले की, कोकणातील हे पहिले आकृती केंद्र असून त्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राकडून सर्व सहकार्य दिले जाईल. कोकणाशी निगडीत समस्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी करता येतील, त्यामुळे विशेषतः येथील तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तर डॉ. मेहेत्रे यांनी कोकणची विशिष्ट प्रकारची वैविधता उदाहरणादाखल स्पष्ट करत, तिच्या जतनासाठी आकृती केंद्राची मोठी मदत होईल, असे नमूद केले.
स्थानिक पातळीवर प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि उत्पादनास मार्गदर्शन
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेने या केंद्रासाठी आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये जागा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. येथून स्थानिक स्तरावर केंद्राची उद्दिष्टे राबविणे, प्रात्यक्षिके दाखविणे तसेच नागरिकांना प्रशिक्षित करण्याचे काम केले जाणार आहे.
या केंद्रामुळे बार्ककडून परवाना मिळालेल्या उत्पादनांचे उत्पादन अथवा विपणन करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन स्थानिक पातळीवरच मिळू शकणार आहे. त्यामुळे कोकणातील नवोद्योजक, विद्यार्थी आणि स्थानिक घटकांना तांत्रिक व व्यावसायिक पातळीवर नवा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













