रत्नागिरीतील विश्वनगर येथे घराला भीषण आग; देवघरातील दिव्यामुळे आग भडकल्याने पावणेदोन लाखांचे नुकसान!

रत्नागिरीतील विश्वनगर येथे घराला भीषण आग; देवघरातील दिव्यामुळे आग भडकल्याने पावणेदोन लाखांचे नुकसान!

नगरपालिकेचा बंब व स्थानिक तरुणांच्या तत्परतेने अनर्थ टळला; सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर यांच्याकडून बाधित कुटुंबाला तात्काळ १० हजारांची मदत

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विश्वनगर परिसरात नगरपालिका कर्मचारी वसाहतीसमोर असलेल्या सुनील सुवरे यांच्या घराला आज सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. देवघरातील तेवत्या दिव्यामुळे आग भडकल्याने घरातील साहित्याचे सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने नगरपालिकेचा अग्निशमन बंब आणि स्थानिक तरुणांनी वेळेत धाव घेतल्याने ही आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.

देवघरातील दिव्यामुळे लागली आग; तरुणांच्या मदतीने विझवली :

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनगर येथील नगरपालिका कर्मचारी वसाहतीसमोर सुनील सुवरे यांचे घर आहे. आज सायंकाळच्या सुमारास देवघरातील दिव्यामुळे अचानक घरामध्ये आगीने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. तसेच स्थानिक तरुण प्रवीण वाघेला, घोसाळे, सूरज पवार, संकेत कांबळे, नरेश मोहिते आणि स्वरूप जाधव यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवले. या आगीत सुवरे कुटुंबाचे सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

#concepts\'

सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर यांचा मदतीचा हात :

आगीची घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुवरे कुटुंबाची विचारपूस केली. या संकटाच्या काळात कुटुंबाला दिलासा देण्यासाठी त्यांनी तातडीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत सुवरे कुटुंबाकडे सुपूर्द केली. त्यांच्या या तत्पर सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे.