रत्नागिरी विभागातील प्रवासी संख्येत ५० टक्के घट; तांत्रिक अडचणी व अपुऱ्या माहितीमुळे कार्ड सक्तीला तात्पुरता ब्रेक
ST NCMC Card Rule Relaxed अंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड सक्ती केल्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला असून, आता ३१ डिसेंबरपर्यंत एनसीएमसी कार्ड नसले तरी महिलांना एसटी बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत प्रवासी संख्या कमी होऊन एसटी महामंडळास २४० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. विशेषतः रत्नागिरी विभागातील प्रवाशांची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी घटल्याने आणि राज्यासह जिल्ह्याच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने महामंडळाने कार्ड सक्तीला तात्पुरता ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे.
अपुऱ्या पूर्वतयारीअभावी घेतलेला कार्ड सक्तीचा धोरणात्मक निर्णय राज्य महामंडळास अंगलट आल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात एसटीच्या तोट्यात तब्बल १५० कोटी रुपयांची वाढ झाली असून, अवघ्या महिनाभरात एकूण तोटा २४० कोटी रुपयांहून अधिक नोंदवला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मागील दोन महिन्यांत लाखो प्रवाशांची संख्या घटल्याने विभागाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
ST NCMC Card Rule Relaxed: तांत्रिक अडचणी आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे
सद्यःस्थितीत राज्यभरात केवळ ४३ टक्के महिलांकडेच एनसीएमसी कार्ड उपलब्ध असून, उर्वरित ५७ टक्के महिला प्रवाशांकडे अद्याप कार्ड नाही. तांत्रिक आणि व्यावहारिक त्रासामुळे संतप्त झालेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांनी व इतर प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

एनसीएमसी कार्ड काढण्याबाबत आणि त्याच्या अंमलबजावणीत समोर आलेल्या प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत:
गावखेड्यातील महिलांपर्यंत कार्ड काढूनच सवलतीचा प्रवास करता येणार असल्याबाबत तसेच कार्ड रिचार्ज करण्याबाबत पुरेशी माहिती न पोहोचल्याने अनेकांना नोंदणी करणे शक्य होत नव्हते.
तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव यामुळे महिलांना प्रत्यक्ष प्रवासात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
या समस्येवर मात करण्यासाठी आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरापर्यंत विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन केले जाणार असून, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांची मदत घेतली जाणार आहे.













