राजापूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांसाठी मोठी खुशखबर! तारळ आणि देवाचे गोठणे येथील बंदरे व पोचरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी २ कोटी १४ लाखांहून अधिक निधीची ई-निविदा प्रसिद्ध

राजापूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांसाठी मोठी खुशखबर! तारळ आणि देवाचे गोठणे येथील बंदरे व पोचरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी २ कोटी १४ लाखांहून अधिक निधीची ई-निविदा प्रसिद्ध

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे आणि लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे निविदा प्रक्रिया सुरू

राजापूर (रत्नागिरी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे आणि लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, राजापूर तालुक्यातील किनारी भागातील मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दोन कामे आता प्रत्यक्षात मार्गी लागली आहेत. तारळ आणि देवाचे गोठणे (बुरुंबेवाडी) येथील बंदराकडे व जेट्टीकडे जाणाऱ्या पोचरस्त्यांच्या आणि जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग (बंदरे व परिवहन) अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सागरी मंडळाने (Maharashtra Maritime Board) अधिकृत ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही कामांसाठी मिळून सुमारे २ कोटी १४ लाख २९ हजार ८१० रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे दोन्ही कामांची ई-निविदा प्रसिद्ध :

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत व अनुभवी ठेकेदारांकडून बी-१ नमुन्यात या कामांसाठी ई-निविदा (mahatenders.gov.in)
https://mahatenders.gov.in)
मागविण्यात आल्या आहेत. या कामांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

Hotel star caters

१) तारळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील जेट्टीकडे जाणाऱ्या पोचरस्त्याचे मजबुतीकरण करणे :

या कामाच्या निविदेची अंदाजित किंमत १ कोटी १२ लाख ४२ हजार ७७३ रुपये (रु. १,१२,४२,७७३/-) इतकी आहे. या कामामुळे तारळ येथील मच्छीमारांना जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे.

२) देवाचे गोठणे बुरुंबेवाडी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील बंदराकडे जाणाऱ्या पोचरस्त्याचे व जेट्टीचे मजबुतीकरण करणे :

या कामाच्या निविदेची अंदाजित किंमत १ कोटी १ लाख ८७ हजार ०३७ रुपये (रु. १,०१,८७,०३७/-) इतकी आहे. या निधीतून बंदराकडे जाणारा पोचरस्ता तसेच जेट्टीचे मजबुतीकरण केले जाणार असल्याने स्थानिक मच्छीमारांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

किनारी भागातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण :

तारळ आणि देवाचे गोठणे बुरुंबेवाडी परिसरातील मच्छीमार बांधवांकडून बंदराकडे जाणाऱ्या पोचरस्त्यांच्या व जेट्टीच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे आणि आमदार किरण सामंत यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत तात्काळ निधी मंजूर करून महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत निविदा प्रक्रिया सुरू केल्याने राजापूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांमधून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.