जलसंधारणाचा आदर्श उपक्रम! क्रेडाई रत्नागिरी, लायन्स क्लब आणि मिरजोळे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘वनराई बंधारा’ उभारणी

जलसंधारणाचा आदर्श उपक्रम! क्रेडाई रत्नागिरी, लायन्स क्लब आणि मिरजोळे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘वनराई बंधारा’ उभारणी

मिरजोळे येथील पाटीलवाडी ब्रिजजवळ श्रमदानातून बांधला बंधारा; भूजल पातळी वाढवून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याचा स्तुत्य प्रयत्न

रत्नागिरी : जलसंधारणाच्या माध्यमातून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी क्रेडाई रत्नागिरी, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि ग्रामपंचायत मिरजोळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मिरजोळे येथील पाटीलवाडी, ब्रिजजवळ ‘वनराई बंधारा’ बांधकाम उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात आला. तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय श्रमदानातून हा बंधारा उभारण्यात आला आहे.

भूजल पातळी वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल :

पावसाळ्यानंतर ओढ्या-नाल्यांतून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत साठा वाढविणे, परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवणे आणि जलसंधारणाला चालना देणे, या मुख्य उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वनराई बंधाऱ्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या रिकाम्या सिमेंटच्या गोण्या क्रेडाई रत्नागिरीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या गोण्यांमध्ये माती-वाळू भरून व्यवस्थित रचून भक्कम वनराई बंधारा बांधण्यात आला.

Syramic tiles

मान्यवरांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग :

हा उपक्रम क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. महेश गुंदेचा, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. सुमित ओसवाल आणि मिरजोळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रत्नदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी क्रेडाई रत्नागिरीचे पदाधिकारी व सदस्य, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामपंचायत मिरजोळेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकजुटीतून आणि श्रमदानातून हा जलसंधारण उपक्रम यशस्वी ठरला असून, परिसरातून या स्तुत्य कार्याचे कौतुक होत आहे.