मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी चाचणी; दुसऱ्या मार्गिकेच्या भरावाचे व डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
Chiplun Flyover चे काम पूर्ण झाले असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील या उड्डाण पुलावर वाहतुकीची तांत्रिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. प्रांताधिकारी कार्यालयापासून पुढे पंचायत समितीपर्यंतच्या मार्गावर दोन ते वीस फुटांपर्यंत टाकलेल्या भरावाचे आणि त्यावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी दोन तास हा पूल एकदिशा मार्गाने वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २७) संपूर्ण दिवसभर मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी पूल खुला ठेवून भरावाची चाचणी घेण्यात आली.
गेली १७ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात ही घडामोड प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी पुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना हा पूल बहादूरशेख येथे कोसळला होता, ज्यानंतर कामाचा दर्जा आणि पुलाच्या आराखड्यावरून प्रश्न उपस्थित झाले होते.
त्यानंतर नवा आराखडा तयार करून आणि कामाच्या दर्जावर लक्ष ठेवून बहादूरशेख ते प्रांत कार्यालयापर्यंतचा उड्डाण पूल पूर्ण करण्यात आला. त्यापुढे पंचायत समितीच्या दिशेने सुमारे २० फुटांपासून २ फुटांपर्यंतच्या भरावाचे काम हाती घेण्यात आले होते.

Chiplun Flyover वरील दुसऱ्या मार्गिकेचे काम आणि पुढील नियोजन
डिसेंबर महिन्यातील पहिले पंधरा ते वीस दिवस या पुलावरून वाहतूक सुरू ठेवून भराव टाकून डांबरीकरण केलेल्या रस्त्याची तांत्रिक चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, गोवा दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेचा भराव आणि डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून येत्या चार दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या भरावावर पुन्हा डांबरीकरण केले जाणार असून हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून वाहतूक सुरू ठेवून भरावाची चाचणी घेतली जाईल. तसेच पुढील दोन दिवसांत पुलावरील विद्युत दिवे सुरू केले जाणार असून भरावाच्या बाजूच्या संरक्षक कठड्यांचे कामही पूर्ण होणार आहे; त्यामुळे येत्या महिनाभरात हा उड्डाण पूल दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होणार आहे.













