अलोरे आणि कुंभार्ली येथील घटना; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख २६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल लंपास, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण (रत्नागिरी) :
चिपळूण तालुक्यातील अलोरे आणि कुंभार्ली या दोन गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घरे फोडून तब्बल ४ लाख २६ हजार २८० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर घरफोडी झाल्याचे तात्काळ लक्षात येऊ नये म्हणून चोरट्यांनी दोन्ही घरांच्या दरवाजांना चक्क एकसारखीच नवीन कुलुपे लावून पोबारा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन घरांचे कुलूप तोडून धाडसी चोरी; जाताना लावले ‘सेम लॉक’ :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजेपासून ते दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडीची घटना घडली. अलोरे येथील वरचीवाडी (समर्थ बैठक हॉलसमोर) येथे राहणारे फिर्यादी संजीव रघुनाथ चव्हाण (वय ३७ वर्षे, व्यवसाय- नोकरी) यांच्या बंद घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला आणि दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरी केल्यानंतर चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाला दुसरे नवीन कुलूप लावले. याशिवाय, कुंभार्ली गावातील नम्रता नंदकुमार आडविलकर यांच्या राहत्या घराचे कुलूपही कशानेतरी कापून चोरट्याने आत प्रवेश केला आणि तेथेही चोरी करून त्यांच्या घराला व फिर्यादीच्या घराला एकसारखेच (सेम) कुलूप लावून पोबारा केला.
लांबवलेला ४ लाख २६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल :
* २,१०,००० रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे तीन पदरी व दोन डवली असलेले सोन्याचे मंगळसूत्र
* ६०,००० रुपये किमतीचा एक तोळा वजनाचा सोन्याचा हार
* ३०,००० रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची कानातील सोन्याच्या टॉप्सची जोडी
* ६,००० रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची कानातील सोन्याच्या रिंगची जोडी
* ९६,००० रुपये किमतीच्या एकूण १६ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या (२ ग्रॅम, ४ ग्रॅम आणि ५ ग्रॅमच्या दोन)
* ३,००० रुपये किमतीची अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ
* ४,८०० रुपये किमतीचा १०० ग्रॅम वजनाचा चांदीचा तुकडा व ४८० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे गणपतीचे चित्र असलेले चांदीचे गोल नाणे
* १६,००० रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या ३२ नोटा)

अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद :
याप्रकरणी फिर्यादी संजीव रघुनाथ चव्हाण यांनी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.३६ वाजता अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस या अनोख्या पद्धतीने चोरी करणाऱ्या चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.













