चिपळूण-कराड मार्गावर एस.टी.चा अपघात

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावर भराडे येथे सकाळी ११ वा. पोफळी- चिपळूण आणि देवरूख-पुणे या दोन एस. टी. गाड्यांमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले तर एक बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खडीवर जाऊन अडकली. प्रवाशांनी एस.टी. बसमधून उड्या टाकून आपला प्राण वाचविला. हा अपघात दि. २५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला, पोफळी-चिपळूण ही गाडी चिपळूणच्या दिशेने भरधाव येत होती. समोरून येणाऱ्या देवरूख-पुणे गाडीला चुकविण्यासाठी बस चालकाने रस्त्याच्या बाजूला खडीवरून नेली. यामुळे बस थोडी कलंडली. यावेळी प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या. बसमधील प्राजक्ता विजय सुर्वे ही तरुणी जखमी झाली असून डेरवणकर नामक व्यक्ती जखमी झाली आहे. त्यांच्यावर चिपळूणमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास शिरगाव पोलिस करीत आहेत. एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 26/Sep/2024