बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक

बांगलादेशमधील चटगाव इस्कॉन पुंडरीक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना पोलिसांनी अटक केली. बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे.

बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंनी रस्त्यावर उतरत याचा विरोध केला. काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेनंतर इस्कॉन मंदिरच्या सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी भारत सरकारला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.

“बांगलादेशातील इस्कॉनच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या चिन्मय कृष्णा दास यांना ढाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याची, चिंतेत टाकणारी माहिती आम्हाला मिळाली आहे. जगभरात इस्कॉनचा दहशतवादाशी कसलाही संबंध नाही, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करणे अवमानजनक आहे. भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि बांगलादेश सरकारसोबत चर्चा करावी, तसेच आम्ही एक शांतता प्रिय भक्ती चळवळ करणारे आहोत, असे आवाहन इस्कॉन करत आहे.”

“बांगलादेश सरकारने तातडीने चिन्मय कृष्णा दास यांना मुक्त करावे, अशी आमची मागणी आहे. या भक्तांच्या सुरक्षेसाठी आम्ही भगवान कृष्णाकडे प्रार्थना करू”, असे ट्विट इस्कॉनकडून करण्यात आले आहे. हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना टॅग करण्यात आले आहे.

चिन्मय कृष्णा दास यांना अटक का करण्यात आली?

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, चिन्मय कृष्णा दास यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ऑक्टोबरमध्ये त्यांनी एक रॅलीला संबोधित केले होते. या रॅलीत त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप आहे. त्यांना ढाका विमानतळावर ढाका पोलिसांच्या गुप्तचर शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

अटकेला विरोध; पोलिसांकडून लाठीमार

चिन्मय कृष्णा दास यांना अटक केल्यानंतर लोक याविरोधात निदर्शने करत आहेत. ढाकातील कोक्स बाजार, चिटगाव या भागात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. मशाल यात्रा काढली. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 26-11-2024