रत्नागिरी : शहरात अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांचा माग काढण्यात पोलिसांनी सुरुवात केली आहे. यातील प्रमुख संशयितांसह अजून सापळयात न अडकलेल्या तरुणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, नवीन साखळी मोडीत काढण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. गवळीवाडा ते बाजारपेठ, चर्चरोड, राजिवडा, मिरकरवाडा जेट्टी, उद्यमनगर, एमआयडीसी येथे साध्या वेशातील पोलीस गस्त घालत आहेत. गस्त घालणारे पोलीस अमलीपदार्थ विक्रीवरच नव्हे तर विक्री करणाऱ्यांच्या गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवून माहिती संकलित करत आहेत. त्यामुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
माजी मंत्री तथा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांची गय करु नका त्यांच्यावर कडक करवाई करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अमलीपदार्थ विरोधी कारवाया करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. अमलीपदार्थ विक्री करताना पकडलेल्या आणि जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर लक्ष ठेवले जात आहे. या गुन्ह्यातील काही संशयित पुन्हा तोच व्यवसाय करुन समाज स्वास्थ्य बिघडवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
रहिवासी ठिकाणांसह रस्त्याच्या आडोशाला गजबजलेल्या परिसरात अनेक तरुण अमलीपदार्थ विकत आहेत. या संदर्भात आमदार उदय सामंत यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. साध्या वेषातील पोलिसांनी गवळीवाडा, बाजारपेठ, चर्चरोड, राजीवडा, मिरकरवाडा जेट्टी, उद्यमनगर या परिसरात लक्ष केंद्रित केले आहे.
या ठिकाणी यापूर्वीही कारवाया करण्यात आल्या आहेत. अमलीपदार्था विरोधात पोलीस अॅक्शन मोडवर आल्यामुळे आता विक्रेत्यांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दिवसभरासह सायंकाळीही मोहीम तीव्र केली जाणार आहे.
अमलीपदार्थ विक्रीतील नवी यादी पोलिसांकडे तयार
अमलीपदार्थ विक्रीत सातत्याने शहरात वाढ होत असून, ठराविक भागातच याची विक्री होत आहे. छोट्याछोट्या प्रमाणात हजारो रुपयांची उलाढाल होत असून, अमलीपदार्थ विक्रीतील माहीर व्यक्तींसोबत अनेक तरुण सहभागी असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे अशा तरुणांची यादीच पोलिसांनी तयारी केली असून, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 12/Dec/2024














