चिपळूणातील उड्डाणपुलाच्या नवीन पिअर कॅपचे काम गतीने सुरू

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या पिअर कॅप तोडण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे आता एकाचवेळी दोन्ही बाजूंनी नवीन पिअर कॅपचे काम सुरू केले आहे. त्यासाठी चार टीम कार्यरत आहे. पुलाच्या कामाला बूस्टर मिळण्यासाठी अजून काही टीम मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उड्डाणपुलाच्या कामास गती मिळण्याची शक्यता आहे.

चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत; मात्र या कामात तितक्याच अडचणी येत आहेत. या पुलासाठी सुरुवातीच्या आराखड्यानुसार एकूण ४६ पिलर उभारण्यात आले होते. त्यानंतर पुढील कामाला वेग घेत असतानाच १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा बहादूरशेखनाका येथे काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. त्यावर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या समितीच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल केले. यामध्ये पूर्वीचे पिलरमधील ४० मीटरचे गाळे रद्द करून त्यामधील अंतर कमी करण्यासाठी २० मीटरवर नव्याने पिलर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत बहुतांशी पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. गेले तीन ते चार महिने जुने पिअर कॅप तोडफोडीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर आता कंपनीने आणखी यंत्रणा वाढवून नव्याने पिलर कॅप काम वेगाने सुरू केले आहे. या कामासाठी स्वतंत्र चार टीम केल्या असून पिअर कॅपचे १२ सेटअप् उपलब्ध केले आहेत याशिवाय एकाचवेळी दोन्ही बाजूने काम सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. भरपावसात नवीन पिलरची उभारणी केली जात होती; मात्र या कामास पुरेशी गती मिळालेली नाही. आवश्यक तेवढी यंत्रणा तैनात झालेली नाही. त्यामुळे पुलाचे काम संथगतीने सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 12/Dec/2024