रेबीज आजाराबद्दल माहिती घेऊन स्वतःची काळजी घ्यावी : डॉ.अनिरुद्ध आठल्ये

रत्नागिरी : रेबीजबद्दल जनजागृती तसेच काय काळजी घ्यावी यासाठी हा २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. शामरावजी पेजे सभागृहात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना रेबीज आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सध्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी रेबीजची लस मोफत उपलब्ध असून एप्रिल २०२४ पासून एकूण श्वानदंश झालेल्या १ हजार ४०९ रुग्णांनी लस घेतली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. तसेच नागरिकांनी रेबीज आजाराबद्दल माहिती घेऊन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

रेबीज हा प्राण्याकडून मानवास होणारा (झुनोटिक) विषाणूजन्य आजार असून हा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो.रेबीज हा आजार कुत्रे, मांजर आणि वन्यप्राण्यांसह सस्तन प्राण्यांत संक्रमित होऊन लाळेद्वारे पसरतो. सामान्यतः चाव्याद्वारे, ओरखडे किंवा श्लेष्मल त्वचेच्या थेट संपर्काद्वारे (उदा. डोळे, तोंड किंवा उघड्या जखमा)होतो. मानवी रेबीज मृत्यूचे बहुसंख्य स्रोत कुत्रे आहेत, जे मानवांना होणाऱ्या सर्व रेबीज संक्रमणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे.

रेबीजचा कुत्रा कसा ओळखाल?
कोणत्याही प्राण्याचा चावा रेबीजसाठी कारणीभूत ठरू शकतो. रेबीजच्या प्राण्याच्या वर्तनामध्ये अचानक बदल होणे, उत्तेजक वर्तन, भ्रम, समन्वयाचा अभाव, हायड्रोफोबिया (पाण्याची भीती) आणि एरोफोबिया (ताजी हवेची भीती) हे बदल आढळतात. कार्डिओ- रेस्पीरेटरी अरेस्टमुळे काही दिवसांनी मृत्यू होतो. प्रोग्रेसिव्ह अर्धांगवायू हा मागून पुढे हळूहळू विकसित होतो आणि शेवटी मृत्यू होतो. रेबीज संसर्ग शोधण्यासाठी सध्या उपलब्ध चाचणी पद्धतीचा अवलंब करणे योग्य ठरते.

कुत्रा चावू नये म्हणून काय काळजी घ्यावी ?
कुत्रा मागे लागल्यास त्याचा सामना कसा करावा, याचे मूलभूत प्रशिक्षण पालकांनी द्यावे. एखादा कुत्रा जवळ आला, तर शांत राहा आणि पळून जाऊ नका. यासाठी तो श्वान कशास घाबरतो ते पाहून कृती करावी उदा. फवारा (सेंट), हातातील एखादी वस्तू उगारणे व मोठ्या आवाजात रागावणे. बऱ्याच वेळेस कुत्रा खूप जोरात आल्यास हातातील एखादी वस्तू पुढे करावी. कुत्र्याला घाबरवू नका, विशेषतः जर तो त्याच्या पिल्लांचे रक्षण करत असेल तेव्हा तर मुळीच नाही. कुत्र्याला चिडवू नका, कुत्र्याला चिडवणे किंवा दुखवणे टाळा. झोपलेल्या किंवा खात असलेल्या कुत्र्याला त्रास देणे टाळा. कुत्र्यापासून खेळणी दूर नेऊ नका.पळापळी /पाठलाग करण्यासारखे खेळ खेळू नका. यामुळे कुत्र्याच्या आक्रमकतेला प्रोत्साहन मिळू शकते.कुत्र्यांना गोष्टींचा पाठलाग करणे आणि पकडणे फार आवडते. कुत्रा मागे लागल्यास पळू नका, स्थिर उभे राहा आणि आपले हात आपल्या बाजूला ठेवा. पालकांसाठी सूचना – लहान मुलाला किंवा बाळाला कुत्र्यासोबत कधीही एकटे सोडू नका,आपल्या लहान मुलाला कधीही कुत्र्याला प्रशिक्षण देण्यास पाठवू नका. तुमच्या मुलाला कधीही कुत्र्याची कॉलर, कान किंवा शेपटी ओढू देऊ नका.

श्वानदंश झाल्यास काय करावे?
प्राण्यास श्वानदंश झाल्यासः जखमा पूर्णपणे धुणे, पशुवैधयकीय दवाखान्यात जाऊन रेबीज लसीचा कोर्स करावा व उपचार करावेत.

व्यक्तीस श्वानदंश झाल्यास म्हणजेच एखाद्या व्यक्तीला प्राण्याने चावा घेतल्यास किंवा ओरबाडले असल्यास, जखमा पूर्णपणे धुणे व ताबडतोब नजीकच्या जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार घ्यावेत. उदा. मानवी रेबीज लसीचा कोर्स घ्यावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 27/Sep/2024