सुदृढ शरीर, आरोग्य हीच खरी संपत्ती : सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा पाटील

रत्नागिरी : अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा आहे. अनेक जण पैशाला संपत्ती मानतात, परंतु सुदृढ शरीर, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. खेळामुळे आपल्याला ती प्राप्त करता येते, असे प्रतिपादन रत्नागिरी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा पाटील यांनी केले.

येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज (१३ डिसेंबर) दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे महामार्ग पोलीस हातखंबा टॅपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचे संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी प्रशासन ही एक सांघिक जबाबदारी आहे. कोणी एकता प्रशासन चालू शकत नाही. तसेच खेळातही सांघिक भावना महत्त्वाची आहे. एकत्रित मिळून खेळ खेळण्यास नक्की यशस्वी होता येते. खेळातून सुदृढ शरीर संपत्ती कमावता येत असल्याने माझ्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे महामार्ग पोलीस हातखंबा टॅपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी “नवनिर्माण”शी आपले जुने संबंध असल्याचे नमूद करतानाच आता क्रीडा कोटामधून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने खेळाचे महत्व अधोरेखित होत असल्याचे सांगितले. आज अनेक जण उत्तम शरीर संपदा मिळवण्यासाठी जिमला जातात मात्र ती खेळातूनही आपल्याला मिळवता येते. या महोत्सवातून भविष्यातील खेळाडू घडतील आणि शासनाच्या सेवेत येतील, असा विश्वास श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Mahrashi karve ANM

चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी खेळ ही शालेय नाही तर मानवी जीवनातील आवश्यक गोष्ट असल्याचे सांगतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव इंडोअर बास्केटबॉल कोर्ट नवनिर्माण शिक्षण संस्थेत असल्याचे सांगितले. हरण्यातही जिंकणे असते. हरण्यामुळे जिद्द, इर्षा वाढते. आजचे हरणे उद्याचे जिंकणे आहे. त्यामुळे आज क्रीडा स्पर्धांमध्ये हरलात तरीही नाराज, निराश होऊ नका. अपमान वाटून घेऊ नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांना विद्यार्थ्यांकडून संचालनाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करून ती मैदानावर आणण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनिर्माण हायच्या शिक्षिका वैष्णवी चव्हाण यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांनी गोळा फेक करून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. १३ आणि १४ डिसेंबर असा दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी, व्हॉलीबॉ, धावणे, गोळाफेक, क्रिकेट, बॅडमिंटन, रस्सीखेच आदी विविध प्रकारचे खेळ खेळवले जाणार आहेत. हा क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 14/Dec/2024