रत्नागिरी : जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आता सहाय्यक संस्था म्हणून सक्षम ग्रामसंघाची निवड करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात 1 हजार 124 गावांमध्ये महिला बचतगटांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.
जलजीवन मिशन उपक्रमामध्ये गावांतर्गत पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी नियोजन, आराखडा, अंमलबजावणी, व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामस्तरावर समुदायांना एकत्र करून त्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक गावात सहाय्यक संस्था म्हणून सक्षम ग्राम संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये महिला बचतगटाचा समावेश करण्यात येणार आहे. या महिला बचतगटांना 2 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
या महिला बचतगटांना ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करणे, अपेक्षित लोकवर्गणी गोळा करणे, योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी व्यवस्था निर्माण करणे, समित्यांच्या बैठका आयोजन, ग्रामसभा आयोजन करणे, सांडपाणी व्यवस्थापन इ. विषयाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीस सहाय्य करणे, नळ जोडणी संबंधी कुटुंबांना प्रोत्साहीत व प्रवृत्त करणे, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामपंचायत व जिल्हा कार्यालय यांच्यामध्ये दुवा म्हणून काम पाहणे, समाज संघटन व माहिती व संवाद उपक्रम राबवणे. केंद्र, राज्य व जिल्हा स्तरावरील विविध अभियानांमध्ये सक्रीय सहभागी होऊन अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे. पाण्यासंबंधी विविध बाबी जसे पाऊस पाणी संकलन, कृत्रिम पुनर्भरण, पाणी गुणवत्ता, जलजन्य आजार, पाणी बचत, पाण्याची हाताळणी, पाणी पुरवठा योजना इ. संबंधी जाणीव जागृतीपर उपक्रम राबवणे आदी त्यांची कार्ये असणार आहेत.
जिल्ह्यात 1 हजार 124 गावांमध्ये नळपाणी योजनांमध्ये या महिला बचतगटांना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. जास्तीत जास्त महिला बचतगटांनी यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावेत, असे आवाहन जि. प. प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 27-09-2024