नाणीज येथे अंडरपास आणि निवळीला उड्डाणपूल ऐवजी सरळ रस्त्याची मागणी

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गावर नाणीज येथे आजूबाजूच्या गावाच्या सुरक्षिततेसाठी अंडर पास व्हावा आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणारा उड्डाणपूल ऐवजी सरळ महामार्ग व्हावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि छोट्या व्यवसायिकांनी शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याच्या आणि आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन नीलेश राणे यांनी यावेळी दिले.

रत्नागिरी तालुक्यातून मुंबई ते गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी महामार्गाचे काम करताना स्थानिकांना संबंधित विभाग आणि ठेकेदारांनी विश्वासात घेतले नसल्याचे पुढे आले आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी दौऱ्यावर आलेले भाजप नेते तथा माजी खासदार नीलेश राणे यांची संबंधित ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिकांनी भेट घेतली.

त्यामध्ये मिऱ्या-नागपूर महामार्गावर नाणीज येथे काही दिवसांपूर्वी एक दुर्दैवी अपघात होऊन दोघेजण मृत्युमुखी पडले. सातत्याने या भागात अपघात होत आहेत. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान-मोठी गावे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी येथे महामार्गावर अंडर पास करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी मिऱ्या नागपूर महामार्ग विभागाचे उपव्यवस्थापक गोविंदा भैरवा तसेच अधिकारी राकेश सिंग आणि ठेकेदार उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांच्या या मागणीचा तातडीने विचार करा, यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत निश्चित करू, असे नीलेश राणे यांनी सांगितले तर महामार्गाच्या दोन्ही बाजूला बस स्टॉप देण्याचेही अधिकाऱ्यांनी मान्य केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणारा उड्डाणपूल ऐवजी सरळ महामार्ग व्हावा अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांनी नीलेश राणे यांच्याकडे केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 28/Sep/2024