रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात वायू गळतीच्या घटना सुरू आहेत. यातच सोमवारी दुपारी शहरातील मारूती मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या हिंदू कॉलनीत रस्त्यात उभ्या असलेल्या वॅगनार कारमधील सीएनजी गॅस लिकेज झाल्याने साऱ्यांची धावपळ उडाली. गाडीतील सू….सू…. आवाजाने पुरती गाळण उडाली. गाडीच्या आजूबाजूला जाण्यास कोणीही धाजावत नव्हते.
सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हिंदू कॉलनी येथील कलानिकेतन या बिल्डींगच्या बाहेर रस्त्यावर एक वॅगनर कार उभी करून ठेवण्यात आली होती. गाडीतील गॅस गळतीने आजूबाजूच्या बिल्डिंग मधील लोक बाहेर आले. साऱ्यांची धावपळ उडाली. हा हा म्हणता ही बातमी हिंदू कॉलनीत पसरली. गाडीतील गॅस गळती झाल्याची माहिती नगर परिषद अग्निशमन पथकाला तसेच एमआयडीसी येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. दोन्ही पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. त्या कारमधील गॅस टाकीचा नोझल खराब झाल्याने ही सीएनजी गळती सुरू झालेली होती. पण तो गळती होणारा सीएनजी हवेत सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे टाकीतील गॅस बाहेर निघेपर्यंत अग्निशमन पथके त्याठिकाणी नजर ठेवून होती. येथील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काही वेळाने टाकीतील सीएनजी बाहेर पडल्यानंतर साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 24-12-2024












