संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पाठोपाठ संगमेश्वर तालुक्यातील देवरुख-साखरपा मार्गावर चाफवली येथे रस्त्यावर गव्याचे दर्शन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. गव्यांचा वावर वाढू लागल्यामुळे शेती-बागायतीसह मानवी वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे.
चांदोली अभयारण्यासह मार्लेश्वरच्या जंगल परिसरात वास्तव्यास असलेला गवारेड्याचे कळप चिपळूण, संगमेश्वर, लांजा तालुक्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. गावाबाहेरील भातशेतीसह भाजीपाला लागवडीत शिरून धुडगूस घालणाऱ्या गव्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संगमेश्वर तालुक्यात चाफवली येथे कालपासून थेट रस्त्यावर गवा फिरत असताना पाहायला मिळत आहे. तेथील काही शेतकऱ्यांचेही नुकसानही गव्याने केल्याचे समजते. गव्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्यापाठोपाठ गव्यांचा वावर हा वन विभागाचीही डोकेदुखी आहे. कळपातून वाट चुकलेला गवा हा धोकादायक असून, तो केव्हाही कुणावर हल्ला करू शकतो. आतापर्यंत गव्याच्या हल्ल्यात रत्नागिरी जिल्ह्यात मृत पावलेल्यांचीही नोंद झाली आहे.
दरम्यान, गेल्या पाच ते सहा वर्षांत गव्यांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांकडून काढण्यात येत आहे. मार्लेश्वरच्या जंगल परिसरातील हे गवे हळूहळू स्थलांतरित होत असल्याचाही अंदाज वर्तविण्यात येत आहे, मात्र हे गवे एकाच ठिकाणी जास्त काळ वास्तव्य करीत नाहीत, त्यामुळे लोकवस्तीजवळ ते राहणार नाहीत, असे निरीक्षकांनी सांगितले. बिबट्यापाठोपाठ गव्यांचे मानवी वस्तीतील वाढलेल्या वावरामुळे ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण आहे, गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. गव्यांबाबत वनविभागाने तातडीने उपायोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरीवर्गातून होत आहे.
गव्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास याबाबत वनविभागाला कल्पना द्या. त्याचा तातडीने पंचनामा करून भरपाई मिळवून दिली जाईल. तसेच गवा दिसल्यास नागरिकांनीही सावधानता बाळगणे गरजेचे आहे. – प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 24/Dec/2024












