निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट, टेंडर प्रक्रियेची चौकशी, पूर्वीप्रमाणे OMR वर ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी
Rohit Pawar CET Percentile Scam Allegations मुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकाराचे प्रकरण ताजे असतानाच, आता महाराष्ट्रातील ‘सीईटी’ (MH-CET) आणि ‘जेईई’ (JEE) परीक्षांच्या निकालांमध्येही मोठा घोळ होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांची, टेंडर प्रक्रियेची आणि निकालांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी तब्बल १० लाख विद्यार्थी सीईटी परीक्षेला बसतात. “अभ्यासू विद्यार्थ्यांना दहावी-बारावीत उत्तम गुण मिळतात, मात्र सीईटी निकालात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. २०२३ नंतर या परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गडबड सुरू झाली आहे. परीक्षा केंद्रे (Exam Centers) मॅनेज केली जात असून, ‘नॉर्मलायझेशन’ (Normalization) आणि ‘पर्सेंटाईल’ (Percentile) काढण्याच्या पद्धतीमध्ये मोठा घोळ केला जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी एका विद्यार्थ्याचे उदाहरण दिले. एका विद्यार्थ्याला २०० पैकी १०४ गुण मिळूनही त्याला अवघे ९ पर्सेंटाईल देण्यात आले! जेव्हा हा विद्यार्थी व त्याचे पालक सीईटी कार्यालयात विचारणा करायला गेले, तेव्हा पर्सेंटाईल काढण्याचे नेमके सूत्र (Formula) काय आहे, हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. माहिती अधिकाराखाली (RTI) देखील ही माहिती उघड केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘एड्युस्पार्क’ कंपनीवर गंभीर आरोप
परीक्षेचे कंत्राट घेणाऱ्या ‘Eduspark’ या कंपनीवरही रोहित पवारांनी जोरदार निशाणा साधला. “या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या ७ विविध विभागांमध्ये काम मिळवले आहे. कार्टेल (गट) तयार करून आपल्याच संबंधित कंपन्यांना टेंडर मिळवून दिले गेले. बिहार सरकारनेही या कंपनीसंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती,” असा आरोप करत त्यांनी परीक्षा टेंडर प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आमदार रोहित पवारांच्या प्रमुख मागण्या:
- निकालांचे फॉरेन्सिक ऑडिट: २०२३ पासून झालेल्या सर्व सीईटी परीक्षांच्या निकालांचे तातडीने Forensic Audit करण्यात यावे.
- अकॅडेमिक कोरिलेशन तपासणे: विद्यार्थ्यांचे १० वी, १२ वी आणि सीईटी गुणांचे Academic Correlation तपासावे.
- एजंटच्या जाळ्याचा पर्दाफाश: परीक्षा केंद्रावर सेटिंग करून देणाऱ्या संस्था, खासगी क्लासेस आणि एजंट्सच्या रॅकेटचा शोध घेऊन कारवाई करावी.
- टेंडर प्रक्रियेची चौकशी: ‘एड्युस्पार्क’ कंपनीसह कंत्राट प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी.
- ऑफलाइन OMR परीक्षा: ऑनलाइन प्रक्रियेतील पारदर्शकता संपल्याने परीक्षा पुन्हा पूर्वीप्रमाणे OMR सीटवर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 04-08-2026














