संगमेश्वर तालुक्यातील ३ हजार हेक्टरहून अधिक शेती ओलिताखाली येणे बाकी; आशिष शेलार व प्रशासनाकडे पाठपुराव्याची मागणी
Kuchambe Gadnadi Irrigation Project संदर्भात कोकणातील सिंचन क्षेत्राशी संबंधित एक अत्यंत गंभीर बाब समोर येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथील गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम १९८२-८३ च्या सुमारास सुरू होऊन आतापर्यंत तब्बल ९४८.२७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, उघड्या कालव्यातून तसेच बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची योग्य व्यवस्था उभारण्यात न आल्याने गेल्या ४ वर्षांत स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत एकही थेंब पाणी पोहोचलेले नाही. परिणामी, कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला असल्याची तीव्र टीका होत आहे.
या प्रकल्पाचे सध्याचे सुधारित अंदाजपत्रक ११६३.४० कोटी रुपयांचे असून, ते पुढील मंजुरीसाठी वरिष्ठ जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आले आहे. मात्र, या सुधारित अंदाजपत्रकाला अद्याप मंजुरी न मिळाल्याने प्रत्यक्ष काम ठप्प झाले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने’त (PMKSY) या धरणाचा समावेश करण्यात आलेला आहे, तरीही प्रशासकीय उदासिनतेमुळे शेतकरी पाण्यासाठी वंचित आहेत.
३ हजार १११ हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची अपेक्षा
या प्रकल्पामुळे परिसरातील तब्बल ३ हजार १११ हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येण्याची प्रचंड क्षमता आहे. धरणाचे पाणी नियमितपणे उपलब्ध झाल्यास या भागात दुबार भातशेती, दुबार भाजीपाला आणि विविध पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील, असे प्रतिपादन संगमेश्वर पंचायत समिती सदस्य महेश महादेव जड्यार यांनी केले.
या गंभीर समस्येबाबत महेश जड्यार यांनी रत्नागिरी दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार आणि विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व या प्रकल्पाला गती देण्याची विनंती केली. याशिवाय मुंबईतील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनाही पत्र पाठवून तातडीने उरलेली कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. “सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले, पण शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलून हा प्रकल्प पूर्ण करावा,” अशी ठाम मागणी जड्यार यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 04-08-2026














