रत्नागिरी : थंडीमुळे मच्छीमारांवर संकट!

रत्नागिरी : थंडीमुळे मच्छीमार नौकांना मासळी मिळण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार नौका बंद ठेवल्या, तर खलाशी पळून जातात, अशा कात्रीत रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार नौका मालक सापडले असून नाईलाजाने नौका मासेमारीसाठी समुद्रात पाठवल्या जात आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. या थंडीमुळे समुद्रातील मासा स्थलांतरित होत असल्याने बहुसंख्य स्थानिक मच्छीमार नौकांना मासळी मिळण्याचे प्रमाण घटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३ हजार ७०० यांत्रिक व बिगरयांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर खलाशी आगाऊ रकमा देऊन जिल्ह्याबाहेरून आणावे लागतात.

आगाऊ रकमा देऊन आणलेल्या खलाशांना दर आठवड्याला पगारसुद्धा द्यावा लागतो. नौका समुद्रात मासेमारीसाठी जातात तेव्हा जिन्नस भरून द्यावे लागते. त्याचबरोबर मच्छीमार नौकेचा इंधनाचाही खर्च असतो. अशा परिस्थितीत रोजच्या होणाऱ्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याचे नौका मालक जावेद होडेकर यांनी सांगितले. एकीकडे मासळी मिळत नसतानाही थंडी कमी होईपर्यंत नौका बंद ठेवताही येत नाहीत. नौका बंद ठेवल्या तर खलाशी पळून जाण्याची भीती असते. खलाशी पळून गेले, तर थंडी कमी झाल्यानंतर नौका समुद्रात मासेमारीसाठी पाठवता येऊ शकत नाही. मच्छीमार अशा दोन्ही पद्धतीने आर्थिक कचाट्यात सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 25/Dec/2024

Gadre2