खेड : तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात रविवार, दि. 22 डिसेंबर रोजी गोवंशाचे अवशेष आढळल्यानंतर जनप्रक्षोभ उसळला. हे कृत्य करणार्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करत बंदची हाक देण्यात आली. त्याला प्रतिसाद देत मंगळवार, दि. 24 रोजी खेडमधील व्यापार्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सकाळी तीनबत्ती नाका येथे शेकडो नागरिक एकत्र आले व त्यांनी खेड पोलिस ठाणे येथे जाऊन पोलिसांना निवेदन देऊन गोवंश हत्येप्रकरणी कसून चौकशी करून हे कृत्य करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
गेले दोन दिवस खेड शहरासह तालुक्यातील वातावरण या घटनेमुळे गढूळ असून या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू बांधवांकडून खेड बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. त्याचबरोबर दि. 24 रोजी सकाळी तीन बत्ती नाका येथून मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु काल संध्याकाळीच खेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून या घटनेशी निगडित असलेल्या तीन संशयितांना अटक केली. त्यानंतर खेड शहरातील अनेक हिंदू संघटनांच्या पदाधिकार्यांबरोबर चर्चा करून सहकार्याचे आवाहन केले. पोलीस या घटनेचा तपास करत असून या संदर्भात ज्या गोष्टी पुढे येतील त्या गोष्टींची कसून चौकशी करून या प्रकरणातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिले. त्यानंतर हिंदू बांधवांनी पोलीस प्रशासनाला सहकार्याची भूमिका म्हणून आजचा मोर्चा रद्द केला. परंतु हिंदू बांधवांनी खेड बाजारपेठ उत्स्फूर्त बंद ठेवून खेड पोलीस ठाण्यात एकत्र येत प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. राजमाने यांनी सर्व व्यापारी बंधूंनी सहकार्य करावे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी. आम्ही या प्रकरणाची निगडित असलेल्या सर्व संशयितांना अटक केली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी पोलिस निरीक्षक नितीन भोयर, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, चंद्रकांत कदम, शहरप्रमुख कुंदन सातपूते, भूषण चिखले, वैजेश सागवेकर, भूषण काणे, सतिश चिकणे, अनिकेत कानडे यांच्यासह हिंदू बांधव उपस्थित होते.
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद नाही…
खेडमध्ये गोवंश हत्या झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासांतच तीन संशयितांना अटक केली. याबाबत माध्यमांना माहिती देत त्यांनी नागरिकांनी बंदमध्ये सहभागी न होता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते; परंतु मंगळवारी सकाळपासून संपूर्ण बाजारपेठ बंद होती. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता या गोवंश हत्येच्या कृत्याबाबत बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी होऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 25/Dec/2024














