गुहागर : उंब्रजमधील शालन माने बांबूच्या विणकामातून वस्तू बनवून हाकतायत कुटुंबाचा गाडा

गुहागर : ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’ या कवितेच्या ओळी आजही संसाराचा गाडा हाकण्यासाठी किती चटके सोसावे लागतात याचे वास्तव मांडून देतात. कराडमधील ६० वर्षीय शालन माने या आजही गुहागर तालुक्यातील देवघर-झोंबडी फाटा येथे बांबूच्या विणकामातून विविध वस्तू बनवून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.

एखाद्याचा पारंपरिक व्यवसाय हा त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असतो. कराडमधील माने कुटुंबीय गुहागरसारख्या दूरच्या तालुक्यात येऊन गेली ३ वर्ष हा व्यवसाय करीत आहेत. शालन चिमाजी माने या उंब्रज (कराड) येथे बांबूच्या विणकामातून विविध वस्तू बनवून त्यांच्या विक्रीतून आपल्या संसाराचा गाडा हाकत होत्या. मात्र कालांतराने कराडसारख्या ठिकाणी विणलेल्या वस्तूंना मागणी घटली.

त्यामुळे त्यांनी देवघर-झोंबडी फाटा येथे आपला व्यवसाय सुरू केला. शालन माने यांच्या कुटुंबीयांचा बांबू विणकाम हा पूर्वापार व्यवसाय आहे. या व्यवसायावरच त्यांची रोजी रोटी आहे. गावाकडे शेती नाही. सुरुवातीला उंब्रज येथे हा व्यवसाय अनेक वर्षे केला. मात्र, त्यानंतर याठिकाणी विणलेल्या वस्तूंना असलेली मागणी घटल्याने आपला व्यवसाय त्यांना गुहागर तालुक्यात येऊन करावा लागला आहे. मुलगा पांडुरंग हा गावागावातून बांबू विकत घेतो आणि ते विणकामासाठी आणून देतो.

विणलेल्या वस्तू पुन्हा गावागावात नेऊन त्या विकून त्यातून अर्थार्जन मिळवण्यासाठी या कुटुंबाची धडपड सुरू असते. झारण, थाबड्या, टोक, टोपली, चपाती टोपली आदी वस्तू या बांबू विणकामातून विणून त्या विक्रीसाठी आणल्या जातात.

पूर्वीसारखे सुगीचे दिवस नाहीत
आमचे मूळ गाव कराड-उंब्रज मात्र आमचा पुर्वापार बांबू विणकाम हाच व्यवसाय आहे. आमची रोजी रोटी यावरच असल्याने आणि गावाकडे या वस्तुंना मागणी हवी तशी नसल्याने आम्ही मागील तीन वर्षे गुहागर तालुक्यात हा व्यवसाय करत आहोत. पूर्वीप्रमाणे या व्यवसायाला सुगीचे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे, अशी व्यथा शालन माने यांनी मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 25/Dec/2024