राजापूर : राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यातून, या शिवकालीन पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदीर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा दृष्टिक्षेपात आल्याने येथील शिवकालीन इतिहास आता पुन्हा उलगडण्यास मदत झाली आहे.
येरडव ते अणुस्कुरा शिवकाळामध्ये रहदारी असलेली आणि सद्यस्थितीमध्ये बंद होऊन दुर्लक्षित राहिलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मोघली सैन्यही या पायवाटेने कोकणात खाली उतरल्याचे सांगितले जाते. या पायवाटेवरील चेक नाकाच्या खाणाखुणा पाहता या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूकही झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. एकंदरीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या पायवाटेवरील आणि अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर असलेला हा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा पाहताना या ठिकाणावरून कोकण परिसर, अर्जुना धरणप्रकल्प अन् निसर्गसौदर्य अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार असल्याने भविष्यामध्ये शिवप्रेमी, पर्यटकांसह हौशी ट्रेकर्सची पाऊले या परिसराकडे वळल्यास आश्चर्य वाटणार नाही.
घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणार्या अनेक पायवाटा आहेत. मात्र, कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यापैकी एक असलेली तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा ऐतिहासिक शिवकालीन पायवाट आहे. पाचल-येरडवमार्गे अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर जात मुख्य घाटमार्गाला जोडली जाणारी सुमारे तीन-चार किमी.च्या या पायवाटेचा प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसलेल्या काळखंडामध्ये कोकणातून घाट परिसरामध्ये जा-ये करण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून उपयोग केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अणुस्कूरा घाटमार्गाचे काम करताना अन्य पायवाटांप्रमाणे येरडव-अणुस्कूरा ही पायवाटही बंद झाली. मात्र, या शिवकालीन पायवाटेसह या मार्गावरील ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी शासनाने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 28-12-2024












