ज्ञान व सुसंस्कृतीचे आदर्श व्यक्तिमत्त्व साने गुरूजी : प्राचार्य राजेंद्र वारे

सावर्डे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान साने गुरुजींनी दिले. तुरुंगातच साने गुरुजींनी अनेक पुस्तकांचं लेखन केले. पुस्तक लेखनात साने गुरुजींच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आढळतो. त्यांची अनेक पुस्तके ही लहान मुलांना प्रेरणादायी आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये मानवतावाद, सामाजिक सुधारणा, देशभक्ती यासारखी मूल्ये ओतप्रोत भरलेली होती. ज्ञानी व सुसंस्कृत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून साने गुरुजींच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी या प्रसन्न केले.

मराठी साहित्यातील एक लेखक, कवी, समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचे गुरुजी बनलेल्या साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

साने गुरुजींनी शिक्षक म्हणून केलेले कार्य, त्यांनी सुरू केलेले विद्यार्थी नावाचे मासिक, लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा परिचय करून देताना मराठी साहित्याला मिळालेले एक अक्षरधन म्हणजे श्यामची आई होय. चोरी करणं गुन्हा आहे, पोहायला जाण्यासाठी घाबरलेला श्याम, सुट्टीच्या दिवशी आईला घरकामांमध्ये मदत करणारा श्याम, यासारख्या अनेक उदाहरणांची माहिती विद्यार्थ्यांनी देऊन याचे अनुकरण करून प्रत्येक घरामध्ये सुसंस्कारित श्याम निर्माण होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राजेंद्र वारे यांनी मनोगतात व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय ग्राहक दिनाबद्दल अपर्णा डिके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे नियोजन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जयंत काकडे व साजिद चिकटे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 30/Dec/2024