चिपळूण : कोकण विभागात चिपळूण नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये प्रथम क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. यामध्ये नैसर्गिक परिसंस्थांचे जतन व संरक्षण करण्यासाठीच्या विविध उपायांची अंमलबजावणी करणे आणि वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक कृती उपक्रमांवर नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे, या बाबी समाविष्ट केल्या आहेत.
या अभियानाची रचना कार्बन सिक्वेस्ट्रेशन, हरित वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या वातावरणीय बदलाच्या तीन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान निसर्गाच्या भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पाच घटकांना संबोधित करून आणि नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आखले आहे.
निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली. गेल्या १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत डेस्कटॉप मूल्यमापनासाठी ८१००, फिल्ड मूल्यमापनासाठी ३३०० अशा एकूण ११४०० गुणांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. त्यात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. अभियानाचे डेस्कटॉप मूल्यमापन १५ जून २०२४ रोजी तर फिल्ड मूल्यमापन ८ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले.
चिपळूण पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, हॉर्टिकल्चरिस्ट सूरज सकपाळ, लिपिक कम डेटा ऑपरेटर सेजल महाडिक, फिल्डवर काम करणारे कुशल गमरे, लहू बने, विजय लाखण, आदित्य कांबळे, स्वप्नील साळवी, राकेश जंगम व आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरिक्षक महेश जाधव आणि आरोग्य विभाग कर्मचारी आणि पालिकेचे इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अभियानात उत्तम कामगिरी बजावून ५० हजार ते १ लाख लोकसंख्या नगरपालिका-नगरपंचायत गटामध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला. त्यासाठी ७५ लाखाचे बक्षीस पालिकेला मिळाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 30-09-2024