पुरुषप्रधान व्यवस्थेला प्रश्न विचारते ती ‘आंबेडकरी आई’ : डॉ. सिसिलिया काव्हॉलो

चिपळूण : जी आई शिक्षणाला महत्त्व देते, जी आई पुरुषप्रधान व्यवस्थेला प्रश्न विचारते ती आई आंबेडकरी आई होय, अशी आई या ग्रंथात आहे. बाबासाहेबांच्या मूल्यांचे बोट धरून जगल्या म्हणून त्या जत्रेत हरवल्या नाहीत, अशा या आई आहेत. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य या आईमध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. सिसिलिया काव्हॉलो यांनी ‘आंबेडकरी आई’ या ग्रंथप्रकाशन सोहळ्यात केले.

प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्यामल गरूड यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात झाले. या वेळी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. प्रज्ञा पवार, डॉ. अजित मगदूम उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या स्त्रिया स्वतः कशा जगल्या आणि आपल्या मुलांना कसं घडवलं, याचा पट ४२ लेकींनी या ग्रंथात मांडला आहे.

या वेळी डॉ. कार्व्हलो म्हणाल्या, या ग्रंथात दिसणारी आईंचं मातृत्व हे जैविक मातृत्वापासून सामाजिक मातृत्वापर्यंत सामावलेलं आहे. हे फक्त आईचं चरित्र नसून, ते आजी-पणजीचं चरित्र आहे. ‘आंबेडकरी आई या नावातच संघर्षांचा पट आहे. या आईंनी आपल्या लेकींना जीवनाचे सत्व, तत्त्व दिले त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणावर मात करायला शिकवले आहे. आंबेडकरी आईया प्रवास हा मनुस्मृतीपासून संविधान संस्कृतीपर्यंतचा आहे.

डॉ. अजित मगदम म्हणाले, हे लेखन भावनिकतेने लिहिलेले नसून तटस्थपणे वास्तव मांडणी केली आहे. हे केवळ स्मृतिरंजन नाही. जे घडले आहे ते या सर्व लेकीनी या ग्रंथात मांडले आहे. डॉ. पवार यांनी आमच्यासाठी शिक्षण म्हणजे अक्षरओळख नव्हे. गुलामीला उत्तर देण्याची सुरवात शिक्षणाने होते. याचे भान असणाऱ्या या आई आहेत, असे प्रतिपादन केले. डॉ. मुणगेकर यांनी आंबेडकरी आईत आत्ममग्नता नाही, असे सांगून दलित सहित्याचे हे पुढचे स्थित्यंतर आहे, असा गौरव केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 31/Dec/2024