ककणेर, चतुरांच्या आगमनाने मान्सून परतीचे संकेत

चिपळूण : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात आठ दिवस जोरदार बरसणाऱ्या पावसाने हळूहळू माघार घेण्यास सुरुवात केली असून शनिवारी (दि.२८) दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला आहे. तर मान्सून हंगाम संपत आल्याचे संकेत देणारे धनेश पक्षी (ककणेर) यांच्या आगमनाबरोबरच चतुरांचे थवेही फिरू लागले आहेत. यंदाच्या मान्सून हंगामात चिपळूण परिसरात पावसाने ४ हजार ३०० मि.मी.चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे तर आता मान्सून परतीच्या मार्गावर लागल्याने नवरात्रोत्सवात भात कापणीला वेग येणार आहे.

मागील आठवड्यात संततधार व जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत होती. आठ दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. मात्र, हस्त नक्षत्राच्या आगमनाबरोबर दोन-तीन दिवस पावसाने जाता-जाता जोरदार हजेरी लावली तर शनिवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केल्याचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे आता मान्सून परतीच्या प्रवासाला लागल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यातच निसर्गचक्रामध्ये मान्सून येण्यापूर्वी व मान्सून जाताना वातावरणातील बदल आणि पक्षी व प्राण्यांकडून मिळणारे संकेत आता मिळू लागले आहेत. मान्सून येण्यापूर्वी ‘पेरते व्हा… पेरते व्हा.. ‘ची साद घालणारा पावशा तसेच हलदवा, ककणेर आदी पक्ष्यांचे आगमन होते.

हंगाम संपता संपता पावशाची साद कमी होते. धनेश अर्थात ककणेर अणि चतुरांचे थवे दिसू लागतात. गेल्या दोन दिवसांत ककणेर व चतुरांचे थवे दिसू लागले आहेत. शनिवारपासून दुपारनंतर काहीअंशी हवामान ढगाळ आणि एखादी हलकी सर असा वातावरणात बदल दिसून येत आहे. जूनपासून सुरू झालेल्या मान्सून हंगामात यावर्षी पावसाने ४ हजार ३०० मि.मी.चा टप्पा पार केला आहे. शेतीला पोषक असा पाऊस झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 30/Sep/2024