रत्नागिरी महायुतीत ‘क्रेडिट वॉर’; भाजपच्या दाव्यावर शिवसेना शहरप्रमुखांचा जोरदार आक्षेप!

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या विकासासाठी महायुती सरकारने भरीव निधी दिल्याचा दावा करत भाजप शहराध्यक्षांनी याचे श्रेय आपल्या पाठपुराव्याला दिल्यानंतर, आता महायुतीमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे रत्नागिरी शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, “विकासकामांचे श्रेय कोणी एकट्याने लाटू नये,” असा जाहीर सल्ला भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांना दिला आहे. या वादामुळे रत्नागिरीतील स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपचा दावा काय होता?

आज भाजपचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी एक वृत्त प्रसिद्धीस दिले होते. त्यामध्ये त्यांनी दावा केला होता की, रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३, ७, १०, ११ आणि १५ मधील विविध विकासकामांसाठी त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून महायुती सरकारच्या माध्यमातून या विकासकामांना मंजुरी मिळाली आ

या प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधत विकासकामांच्या प्रस्तावांना गती दिली, असाही उल्लेख ढेकणे यांनी केला होता. आपल्या पाठपुराव्यामुळेच शहरात कोट्यवधींचा विकासनिधी आल्याचे चित्र भाजपकडून निर्माण करण्यात आले होते.

शिवसेनेचा पलटवार : ‘पालकमंत्र्यांशिवाय कामे मंजूर होत नाहीत’

भाजपच्या या दाव्यावर शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. बंदरकर म्हणाले की, “सदर विकासकामांचे श्रेय कोणी एकट्याने लाटण्याचा प्रयत्न करू नये. सध्या फक्त विकासकामांची यादी आलेली आहे आणि केवळ मंजुरी मिळाली आहे. अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.”

भाजपला टोला लगावताना बंदरकर पुढे म्हणाले, “रत्नागिरी जिल्हा किंवा तालुक्यातील कोणतीही विकासकामे हे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मंजुरीशिवाय आणि स्वाक्षरीशिवाय पुढे सरकू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती असताना केवळ स्वतःच्या पक्षाचे श्रेय सांगणे चुकीचे आहे.”

नगराध्यक्ष आणि पालकमंत्र्यांच्या अधिकारांची करून दिली आठवण

बिपीन बंदरकर यांनी या कामांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेवर बोट ठेवत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “या कामांची प्रक्रिया अजून भरपूर बाकी आहे. या कामांच्या निविदा (Tenders) प्रक्रिया राबवण्याचे कायदेशीर अधिकार माननीय नगराध्यक्ष यांना आहेत. तसेच, एखादे काम योग्य पद्धतीने होत नसेल, तर त्या कामांना स्थगिती देण्याचा अंतिम अधिकार हा पालकमंत्री उदयजी सामंत यांना आहे,” अशी आठवण त्यांनी करून दिली.

काम वैयक्तिक नाही, महायुतीचे!

हा विकासनिधी कोणत्याही एका पक्षाच्या नेत्यामुळे आलेला नसून तो संपूर्ण महायुतीचा सामूहिक प्रयत्न असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. “ही सर्व कामे महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या एकत्रित प्रयत्नातून मंजूर झाली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कोणीही एकट्या पक्षाच्या वतीने याचे श्रेय घेण्याचा बालिशपणा करू नये,” अशी स्पष्ट भूमिका बिपीन बंदरकर यांनी मांडली आहे.

राजकीय चर्चांना उधाण :

रत्नागिरीत दोन्ही पक्षांचे नेते एकत्र सत्तेत असतानाही, स्थानिक पातळीवर विकासकामांच्या क्रेडिट वॉरवरून (Credit War) आमनेसामने आले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता भाजप यावर काय प्रत्युत्तर देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.