चिपळूण : छत्रपती शिवाजी चौकातील सुशोभीकरण जमीनदोस्त

चिपळूण : शहर व चौक सुशोभीकरण अंतर्गत पंधरा वर्षांपूर्वी रोटरी क्लबच्या माध्यमातून छ. शिवाजी चौक (चिंचनाका) येथील कोपर्‍यावर उभारण्यात आलेला आकर्षक व विद्युत रोषणाईयुक्त धबधबा बुधवारी नवीन वर्षाच्या प्रारंभी जमीनदोस्त करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून हे कृत्य नेमके कोणी केले? न.प.ने की अन्य कोणी केले? या बाबत उलटसुलट चर्चांसह नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन सभागृहातील पदाधिकार्‍यांनी शहरातील विविध ठिकाणी प्रामुख्याने न.प. मालकीच्या जागांसह चौकामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून विद्युत रोषणाईसह आकर्षक कारंजे तसेच छत्रपती शिवाजी चौक येथे दगडी बांधकामाचा धबधबा उभारला होता. शहरात पर्यटनाला चालना मिळावी व चौकाचौकात सुशोभिकरण व्हावे, न.प.च्या मोकळ्या जागांचा वापर सुशोभिकरणासाठी व्हावा या हेतूने रोटरीच्या माध्यमातून असे उपक्रम शहरात राबविण्यात आले. त्यानुसार छ. शिवाजी चौकात देखील विद्युत रोषणाईसह रंगीबेरंगी आकर्षक असा धबधबा उभारण्यात आला होता.

गेली काही वर्षे या धबधब्याच्या देखभालीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, काही काळ हा धबधबा अधुनमधून सुरू व बंद अवस्थेत होता. तत्कालीन सभागृह व प्रशासनाकडून या ठिकाणी धबधबा उभारणीसाठी रोटरी क्लबची मदत घेण्यात आली. रोटरी क्लबने त्यासाठी रोटरी क्लबने त्यासाठी चौकात सुशोभिकरणाकरिता धबधबा उभारण्याचे नियोजन केले. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने चौकाच्या एका बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने जागा उपलब्ध करून रेखांकन करून दिले. त्यानुसार हा धबधबा उभा राहिला. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धबधबा जमिनदोस्त झाल्याने प्रमुख चौकाच्या सुशोभिकरणावर हातोडा पडून अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे.

सात मजली इमारतीसाठी सुशोभीकरण उद्ध्वस्त?

चिपळूण न.प. प्रशासनातील काही अधिकारी बिल्डर लॉबीच्या तालावर नाचत आहेत. शहरात गेल्या अडीच-तीन वर्षांत स्थानिक लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्त्वात नाही. त्याचा गैरफायदा घेऊन 2018 च्या दरम्यान शासनाने निर्बंध घातलेल्या शहरातील लाल व नीळी पूररेषा अंतर्गत बांधकामाचे उल्लंघन करून बहुमजली इमारती उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्याचा अहवाल प्रशासनाकडे मागितला आहे. मात्र, अद्याप तो दिला नसल्याची माहिती मिळत आहे तर शिवाजी चौकातील धबधबा हा त्यावेळी प्रशासन व सभागृहाने रेखांकित करून दिलेली जागा ही न.प. मालकीची की खासगी मालकीची होती? जर न.प. मालकीची असेल तर तो धबधबा कोणी तोडला? खासगी मालकीची असेल त्यावेळी न.प.ने धबधब्यासाठी त्या जागेचे का रेखांकन दिले? या प्रश्नांबरोबरच संबंधित धबधब्याच्या मागील बाजूस सात मजली इमारत उभी राहिली असून त्या इमारतीसाठीच हे सुशोभिकरण जमिनदोस्त केल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी दिली आहे..

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 02/Jan/2025