तालुक्यातील ३७ गावांची तहान भागणार, ५० टक्के काम पूर्ण; उदय सामंतांची संकल्पना सत्यात उतरणार

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ३७ गावांतील २०४ वाड्यांची तहान भागवणाऱ्या मिऱ्या, शिरगाव, निवळी तिठा यांसह अन्य ३४ गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. पुढील २६ वर्षांतील सुमारे २ लाख लोकांचा विचार करून ही योजना तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे या गावांची तहान भागणार असून, एमआयडीसीवरील पाणीपुरवठ्याचा भार कमी होणार आहे. १३५.७२ कोटी रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात येणार असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली योजनेचे काम सुरू आहे.
रत्नागिरी शहरालगतच्या गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाव लागते. तहान भागवण्यासाठी कसरत करावी लागते. या गावाची तहान भागावी यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून मिऱ्या, शिरगाव, निवळी तिठा या प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात आल्या.
बावनदीवर वळके मराठवाडी येथे कोल्हापूर टाईप बंधारा उभारण्याचे काम सुरू आहे, तर दुसरा बंधारा साठरेबांबर येथे उभारण्यात येणार आहे. १२७ मीटर लांबीचा व चार मीटर उंचीचा हा बंधारा असून येथील विहिरीतून पाणी उचलले जाणार आहे. त्यानंतर उंच व बैठ्या ३४ पाणी साठवण टाक्या व ७ सिंटेक्स टाक्या बसवण्यात येणार आहेत. वेळवंड येथेच जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.
तेथे १५ एमएलटी पाणी साठवण्यात येणार आहे, तर निवळी गावडेवाडी येथे मोठी टाकी बांधण्यात येत असून, तिची क्षमता २४.७० दशलक्ष घनमीटर आहे. तेथून करबुडे, निवळी हातखंबा, पानवल, खेडशी येथील टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. या टाक्यातून नाचणे, कर्ला, शिरगाव, भाटीमिऱ्या, जाकीमिऱ्या या गावांना पाणी सोडण्यासाठी कुवारबाव येथील सामाजिक न्यायभवनाजवळ उंच टाकी उभारण्यात येणार आहे.
सुधारित मिऱ्या, शिरगाव, निवळी तिठा व अन्य ३४ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत जाकीमिऱ्या, मिऱ्या, सडामिऱ्या, आडी, मुसलमानवाडी, शिरगाव, तिवंडेवाडी, झाडगाव, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, कांजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, करबुडे, कुंभारवाडा, मुळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, घवाळवाडी, पानवल, खेडशी, पोमेंडी, कारवांचीवाडी, कुवारबाव, मधलीवाडी, मिरजोळे, पाडावेवाडी, शीळ, ठिकाणदाते, आंबेशेत, नाचणे, जुवे, कर्ला, मुस्लिमवाडी या गावांचा समावेश आहे. योजनेचे काम ५० टक्के शिल्लक आहे. वर्षभरात योजनेचे काम पूर्ण करण्याची तयारी जय दीपराज इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई यांनी केली आहे.