नवोदित वकिलांनी व्यवसायाबाबत काळजी घ्यावी : न्यायमूर्ती तानाजी नलावडे

खेड : नदी उगमाच्या ठिकाणी जशी स्वच्छता असते तसेच नवोदित वकिलांनी व्यवसायाबाबत काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांनी केले. त्यांनी लेखक अॅड. विलास पाटणे यांना न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांचे चरित्र लिहावे, अशी सूचना केली.

येथील सिद्धयोग लॉ कॉलेजमध्ये आयोजित प्रतिमा आणि प्रतिभा पुस्तक प्रदान सोहळ्याप्रसंगी न्यायमूर्ती तानाजी नलावडे बोलत होते. शिवतेज आरोग्यसंस्थेमार्फत कार्यक्रम आयोजित केला होता. ते म्हणाले, निवृत्तीपश्चात खासदारकी, राज्यपाल अशा पदांकडे न पाहता निकाल दिला पाहिजे. तुम्ही पुस्तके वाचली पाहिजेत त्याशिवाय माहिती मिळणार नाही. प्रशासनात सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. या प्रसंगी त्यांनी लेखक तथा रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांना न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांचे चरित्र लिहावे, अशी सूचना केली.

अॅड. पाटणे लिखित प्रतिमा आणि प्रतिभा हे पुस्तक खेडच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. अॅड. पाटणे यांनी ४५ वर्षांच्या वकिलीच्या कार्यकाळात भेटलेल्या अनेक प्रतिभावान व्यक्तींवर तसेच न्यायाधीश, वकिलांवर लेख लिहिले आहेत. या पुस्तकातून नवोदित वकिलांना वकिली, न्यायपरंपरा यांचा उज्ज्वल वारसा समजणार आहे. समन्वयक अॅड. हर्षदा कदम यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 30/Sep/2024