चिपळुणात ‘नो व्हेईकल डे’ ला नागरिकांचा प्रतिसाद

चिपळूण : चिपळुणात नगर परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमात बुधवारी शहरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. यावेळी अनेकांनी सायकलचा वापर करून या उपक्रमाला नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रारंभ केला. चिपळूण नगर परिषदेत या उपक्रमाला सकाळच्या सुमारास शुभारंभ झाला.

शासनाच्या अध्यादेशानुसार नव्या वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्वच नागरिकांनी नो व्हेईकल डे अर्थातच वाहन न वापरण्याबाबत निर्धार करावा. तसेच आपले दैनंदिन व्यवहार सायकल अथवा चालत करावेत असे आवाहन केले आहे. त्यानुसार चिपळूण शहरात या उपक्रमाला चिपळूण, नगर परिषदेपासून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरुवात झाली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग व माझी वसुंधरा अभियान प्रमुख बापू साडविलकर, उपमुख्याधिकारी श्री. दंडवते, उबाठा शिवसेना शहरप्रमुख शशिकांत मोदी, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, श्रद्धा कदम, निर्मला जाधव, समीर कोवळे, मुन्ना कदम, अमोल वीर, महेश जाधव यांच्यासह शहरातील सायकल क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

सहभागींनी सायकल व चालत शहरातून विविध भागात फेरी मारून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नो व्हेईकल डे अर्थात एक दिवस पर्यावरणासाठीच्या माध्यमातून चालत व सायकलने फिरा, असे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 06/Jan/2025