चिपळूण : रोटरी क्लब चिपळूण व साउंड ऑफ म्युझिक यांच्या संकल्पनेतून शहर सुशोभीकरण उपक्रमांतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारंजा साकारण्यात येत आहे. येथील जुना कृत्रिम धबधबा तोडून येथे सध्या कारंजाचे फाउंडेशन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत येथे नागरिकांचे लक्ष वेधणारा कारंजा उभा राहणार असून, त्यातून या चौकाचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.
सामाजिक उपक्रम राबवण्यात हातखंडा असणाऱ्या रोटरी क्लब चिपळूणने सुमारे १५ वर्षांपूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कृत्रिम धबधबा साकारला होता. नगर पालिकेच्या सहकायनि चौक सुशोभीकरणांतर्गत उभारण्यात आलेला हा धबधबा सर्वांसाठीच आकर्षण ठरला होता. चिपळूण शहरातील एक ‘ब्यू पॉईंट’ म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती, मात्र अलिकडच्या काही वर्षात या धबधब्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या धबधब्या जमीनदोस्त करून त्या जागी नजरेला भुरळ घालणारा कारंजा साकारण्याचा निर्णय रोटरी क्लब चिपळूणने घेतला.
एवढेच नव्हे येथील बागा नगर पालिका व बाजूची जागा खासगी मालकीची होती. या जागेच्या मालकाची त्यांनी व सहकाऱ्यांनी भेट घेऊन चौकाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करण्याची विनंती केली होती. त्याला संबंधित मालकाने प्रतिसाद दिला. त्यानुसार येथे तातडीने कारंजा साकारण्याचे काम संबंधित ठेकेदारामार्फत हाती घेण्यात आले आहे. सध्या कारंजाच्या फाउंडेशनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामावर पालशेतकर व सहकारी लक्ष ठेवून आहेत शिवाय वाहतूककोंडी होऊ नये याचीही खबरदारी घेतली जात आहे.
रोटरी क्लबने दिला पूर्णविराम
या परिसरात मागील बाजूला भलीमोठी इमारत उभी राहिली आहे. त्यामुळे या इमारतीसाठी हा कृत्रिम धबधबा तोडला गेला असावा, अशी चर्चा शहरात रंगली होती; मात्र रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी रोटरीची भूमिका स्पष्ट करतानाच येथे नव्याने कारंजा उभारला जाणार असल्याचे सांगितले आणि चर्चाना पूर्णविराम मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 07/Jan/2025














