गुहागर : बौद्धजन सहकारी संघ (रजि.) व भारतीय बुद्ध सासन सभा, तालुका गुहागर यांच्या वतीने बीड आणि परभणी घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निवेदन गुहागर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव उपस्थित होते.
या निवेदनानुसार, परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असणार्या भारताच्या संविधानशिल्प प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना करणार्या व्यक्तीवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, परभणी येथे संविधान प्रेमींवर व आंबेडकर चळवळीतील भीमसैनिक दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत राजीनामा द्यावा व आंबेडकरी जनतेची माफी मागावी, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेकर्यांना कठोर शिक्षा व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर बौद्धजन सहकारी संघ रजिस्टर व भारतीय बुद्ध सासन सभा गुहागर तालुका अध्यक्ष सुरेश सावंत, उपाध्यक्ष विद्याधर कदम, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनील गमरे, कोषाध्यक्ष वसंत कदम, सासन सभा गुहागर तालुकाप्रमुख एस. एल. सुर्वे, दत्ताराम कदम, वैभव गमरे राकेश पवार मनोज गमरे सुरेश जाधव, प्रभाकर मोहिते सचिन पवार विनोद यादव आदींची स्वाक्षरी आहे.
तत्पूर्वी बौद्धजन सहकारी संघ व भारतीय बुद्ध सासन सभा यांचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलिस परेड ग्राऊंडपर्यंत मोर्चा काढण्यात आला. पोलिस परेड ग्राऊंडवर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, बुद्ध सासन सभेचे तालुकाप्रमुख एस एल सुर्वे, त्यानंतर बौद्धजन सहकारी संघ तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी सभेला संबोधित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 10-01-2025













