तरुणांना ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करा : प्रा. डॉ. बाबासाहेब सुतार

रत्नागिरी : अलीकडे विद्यार्थी पुस्तक वाचनापासून दुरावत चालले आहेत. तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी व पुस्तके वाचनाची आवड लागण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या ‘वाचन संकल्प’ महाराष्ट्राचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. बाबासाहेब सुतार यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथील ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपपरिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर, ग्रंथालय सहायक बिपिन जाधव व विद्यार्थी, वाचक, कर्मचारी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. सुतार यांनी विद्यार्थी मित्रांनो, वाचाल तर वाचाल असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला कानमंत्र आठवण करून दिला. तसेच नावाजलेल्या व जगात सर्वाधिक विकल्या गेलेल्या प्रेरणादायी पुस्कांची ओळख स्लाईड शोमार्फत करून दिली. याप्रसंगी डॉ. सुखटणकर म्हणाले, मोबाईल व डिजिटलच्या युगात विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करून पुस्तकांशी मैत्रिपूर्ण जवळीक निर्माण केली पाहिजे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या वाचन संकल्प हा उपक्रम १ ते १५ या कालावधीत राबवण्याचे जाहीर केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 11/Jan/2025