राजापूर पासपोर्ट सेवा केंद्रात फलक लावण्याची मागणी

राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्र राजापूर पोस्ट कार्यालयामध्ये कार्यान्वित आहे. मात्र असे असले तरी त्या पोस्ट कार्यालयाबाहेर पासपोर्ट सेवा केंद्राचा फलक नसल्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाची शोधाशोध करावी लागत आहे. यामुळे नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. दरम्यान राजापूर पोस्ट कार्यालयाच्या बाहेर पासपोर्ट सेवा केंद्राचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

यापूर्वी ऑगस्ट २०१८ साली तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठरेल अशा राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. उभय जिल्ह्यातील नागरिकांनी या पासपोर्ट सेवा केंद्राचा चांगला लाभ घेतला असून दररोज गर्दी देखील तेथे पहावयास मिळते.

मात्र त्या राजापूर पोस्ट कार्यालयाच्या परिसरात पासपोर्ट सेवा केंद्राचा उल्लेख असणारा साधा बोर्ड देखील लावण्यात न आल्याने लांबून पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे पासपोर्ट सुविधा केंद्र नेमके कुठे आहे हे समजत नाही. त्यांना शोधाशोध करावी लागते. काही वेळा तर पोस्टाच्या पुढे आलेले नागरिक रस्त्यावर कुठेही आपली वाहने उभे करतात आणि त्या पासपोर्ट केंद्रामध्ये आपल्या कामासाठी जातात. त्यामुळे मुळात अरुंद असलेल्या त्या मार्गावर काही वेळा वाहतुकीची कोंडी झाल्याचे देखील पहावयास मिळते.

यापूर्वी सातत्याने मागणी होऊन देखील संबंधित विभागाने राजापूर पोस्ट कार्यालयाच्या बाहेर पासपोर्ट सेवा केंद्राचा फलक लावलेला नाही त्यामुळे पासपोर्टसह त्याच्याशी संबंधीत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत संबंधित पोस्ट विभागाने नागरिकांना समजेल अशा पद्धतीने पासपोर्ट सेवा केंद्राचा बोर्ड आपल्य कार्यालयाच्या बाहेर लावावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 13/Jan/2025