मुंबईच्या धर्तीवर रत्नागिरीत ‘मल्टिस्पोर्ट हॉल’

रत्नागिरी : अगदी पाऊस असो वा अन्य कोणताही ऋतू, तुम्हाला आता बिनधास्त क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन असा कोणताही खेळ खेळण्याचा छंद पूर्ण करता येणार आहे. पुणे-मुंबईच्या धर्तीवर रत्नागिरीतील काही तरुणांनी एकत्र येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवरूद्र टर्फ हा स्पोर्ट क्लब सुरू केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी (ता. १२) त्याचा प्रारंभ होणार आहे.

बंदिस्त या २६ बाय ११६ फुटाच्या हॉलमध्ये दिवसरात्र तुम्हाला तुमचे छंद पूर्ण करता येणार आहे. जिल्ह्यासह कोकणात अशा प्रकारचा स्पोर्ट क्लब कुठेच नाही. यापूर्वी देखील या तरुणांनी शिवरूद्रा झांजपथकाने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. याला चांगला प्रतिसाद मिळला, गेल्या नऊ वर्षांमध्ये या झांजपथकाचे चांगले नाव केले. या तरुणांनी पुणे, मुंबई या मोठ्या शहरांच्या धर्तीवर रत्नागिरीत शिवरुद्रा टर्फ हा स्पोर्ट क्लब सुरू केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव हॉल गेली आठ ते नऊ महिने पडून होता. हा हॉल बाजार समितीकडून भाडयाने घेतला. त्या हॉलमध्ये उच्च दर्जाचे लॉन टाकून संपूर्ण हॉल जाळ्यांनी बंदिस्त केला आहे. एकेक तासाचा स्लॉट ठेवून त्याद्वारे भाडे घेऊन खेळण्याचा छंद पूर्ण करता येणार आहे.

रत्नागिरीकरांना काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी आम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन आलो तेव्हा आपल्याकडे सर्व खेळ एकत्रित खेळता येईल, असा कोणताही मल्टिस्पोर्ट हॉल नव्हता. त्यातून ही कल्पना सुचली आणि हा शिवरूद्र टर्फ स्पोर्ट क्लब सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता प्रत्येकाला आपला छंद कधीही पूर्ण करता येणार आहे. – रूपेश पेडणेकर, व्यावसायिक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 13/Jan/2025