देवरुखातील गुणेश भोपटकर घेतो शहिदांच्या कुटुंबीयांची भेट

देवरुख : आपल्या जिवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर जवान कर्तव्य बजावतात. शत्रूसोबत होणार्‍या चकमकीत काही जवान शहीदही होतात. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरकाल राहावे, या उद्देशाने देवरुखातील एक तरुण त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन करतो. गुणेश भोपटकरच्या या आगळ्यावेगळ्या देशसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गुणेश याने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले असून, जपानी भाषेचा अभ्यास त्यांनी केला आहे. जपानमध्ये जाऊन या भाषेचे अधिक शिक्षण घेतले आहे. सध्या तो पुणे या शहरामध्ये नोकरी करत आहे. गुणेशचे आजोबा शिक्षक होते व सामाजिक कार्य करत असताना मोठमोठ्या ग्रंथांचे अभ्यासक होते. वडील विवेक यांनी धार्मिक संस्था उभारली. या दोघांच्या महनीय कार्यातून गुणेशला या कार्याची प्रेरणा मिळाली. सैनिक सीमेवर लढतो तर कुटुंबीयांना त्याची आपल्यापेक्षा जास्त काळजी वाटते. युद्धात सैनिक बलिदान देतात. अशा सैनिकांच्या नातेवाईकांविषयी आपल्याला अत्मियता असल्याचे तो सांगतो.

निवृत्त कॅप्टन अखिलेश सक्सेना हे युद्धात जखमी झाले होते. अशा या महान विभूतीची गणेशची पहिली भेट 2 मार्च 2019 रोजी झाली. आजवर गुणेशने 25 सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव यांची भेट ही आपल्यासाठी महनीय असल्याचे गुणेश सांगतो. मरणोत्तर परमवीर चक्र विजेते कॅ. मनोज कुमार पांडे, कॅ. विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी आपल्या मुलांचे देशासाठी बलिदान झाले, याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी अंगावर रोमांच उभे राहिल्याचा अनुभव गुणेश सांगतो.

कारगिल युद्धात कॅ. सौरभ कालिया व यांचे पाच जवान सहकार्‍यांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडले. या हौतात्म्य पत्करलेल्या कॅ. कालिया यांच्या हिमाचल प्रदेश पालमपूर येथील कुटुंबीयांची देश व परदेशातील नागरिक भेट घेत असतात. वर्षातून 400 हितचिंतक त्यांची भेट घेत असल्याचे कुटुंबीयांनी गुणेशला भेटीप्रसंगी सांगितले.

Radhakrushna patapedhi

हैद्राबाद येथील मेजर पद्मपाणी आचार्य यांचे देशासाठी बलिदान झाले. त्यावेळी त्यांची पत्नी 8 महिन्यांची गरोदर होती. मृत्यूपूर्वी मेजर पद्मपाणी यांनी आपल्या होणार्‍या मुलाला आर्मीतच घालण्याचे वचन पत्नीकडून घेतले होते, हा प्रसंग त्यांच्या नातेवाईकांकडून ऐकताना मन भरून आल्याचे गुणेश सांगतो. आपण घेतलेल्या भेटीमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या विजयंत थापर हे त्यांच्या चौथ्या पिढीतील देशसेवेत आलेले होते. त्यांचे पणजोबा हे ब्रिटिश आर्मीत अधिकारी म्हणून पहिल्या पाच भारतीयांमध्ये होते.

आज कालच्या तरुणांमध्ये देश भावना कमी झाल्याचे दिसते. 18 ते 25 वयोगटातील तरुणांना आर्मी विषयी माहिती असणे आवश्यक आहे. नौदल, वायुदल, भुदल या दलांबरोबरच सैनिकांमधील रँक व जवानांच्या गटसंख्येतील फिल्ड फॉर्मेशन यांचीही माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण या देशाचे नागरिक आहोत, हे म्हणता येईल, असे मत गुणेश याने व्यक्त केले आहे.

जगण्याची नवी उमेद मिळाली
गुणेश याने दिल्लीपासून ते कर्नाटक पर्यंतच्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या ही पुढे हा भेटीचा सिलसिला सुरू राहणार ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जवानांच्या कुटुंबीयांकडून अनुभव ऐकताना जगण्याची नवी उमेद मिळाली. स्वतःच्या सुखापेक्षा राष्ट्रप्रेम किती महत्त्वाचे, याची महती या कुटुंबीयांकडून मिळाली असल्याचेही त्याने सांगितले.

‘गाऊ त्यांना आरती’ व्याख्यान कार्यक्रम
आजवर घेतलेल्या महान विभूतींच्या भेटीतील अनुभव सांगणारा ‘गाऊ त्यांना आरती’ हा व्याख्यान पर कार्यक्रम तयार केला आहे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक कार्यक्रमाप्रसंगी सादरीकरण करण्याचा मनोदय असल्याचे गुणेशने सांगितले आहे. त्याच्या या कार्यासाठी आईची भक्कम साथ मिळत असल्याचे गुणेश आवर्जून सांगतो.

जपान या देशांमधील भारतीय दूतावासात 15 ऑगस्ट 2015 रोजीच्या स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणात सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी भारताच्या आर्मी व एअर फोर्स अधिकारी यांची झालेली भेट अविस्मरणीय ठरली. – गुणेश भोपटकर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 13-01-2025