साडवली : देवाला हळद लागली…… घाणा भरून झाला…… हिंदू धर्मातील लिंगायत विवाहशास्त्र्यानुसार होणारे विवाहापूर्वीचे सर्व पारंपरिक विधी पार पडले आहेत. आता साऱ्यांना प्रतीक्षा आहे श्री देव मार्लेश्वराच्या आणि साखरप्याच्या गिरिजादेवी या दोन देवांच्या विवाहाची. सह्याद्रीच्या कुशीत होणारा हा देवतांचा कल्याण विधी सोहळा मंगळवारी (ता. १४) संक्रांतीच्या मुहूर्तावर दुपारी होणार आहे.
यासाठी असंख्य शिवभक्त हर हर मार्लेश्वराचा गजर करत सह्याद्रीच्या कडेकपारीत दाखल झाले असून, मार्लेश्वर गिरिजेच्या विवाहाला मारळ नगरी नटली आहे.
देवरूख मार्लेश्वर यात्रेनिमित्त आमदार निकम यांनी मार्लेश्वराचे दर्शन घेतले.
१२ जानेवारीपासून सुरू झालेल्या मार्लेश्वर यात्रोत्सवातील श्री देव मार्लेश्वराच्या विवाहापूर्वीचे सर्व विधी आंगवली येथील मूळ मठात झाले. सोमवारी रात्री मठात सत्यनारायणाची पूजा झाल्यावर पुजाऱ्यांनी मठातील मालेश्वराचा टोप हलवून तो सुवासिनींकडे दिला.
माता गंगेची मूर्तीही यावेळी मानकरी अणेरावांच्या मांडीवर ठेवत दोखांचेही पाणे भरण्याचा सोहळा पार पडला. यानंतर देवाला आणि गंगामातेला हळद लागल्यावर त्यांना सुवासिनीनी शुद्ध पाण्याने स्नान आघातले. त्यानंतर देवाचा टोप आणि गंगामातेची मूर्ती जागेवर ठेवण्यात आली. रात्री विवाहापूर्वीचे सर्व धार्मिक विधी झाल्यावर मध्यरात्री १२ वाजताच यजमान वाडेश्वर, देवरुखची दिंडी, वांझोळेची कावड, लांजा वेरळमधून आलेल्या दिंडीसह शेकडो भाविकांना बरोबर घेत चर्मकार बंधूच्या मशालीच्या साहाय्याने मार्लेश्वराच्या पालखीने शिखराकडे प्रस्थान केले.
मंगळवारी होणाऱ्या यात्रोत्सवातील मुख्य दिवसासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निकम यांनी घेतला आढावा
मारळ गावातील पवित्र श्री देव मार्लेश्वर मंदिरात आमदार शेखर निकम यांनी सपत्नीक मनोभावे पूजा केली. या निमित्ताने मार्लेश्वर मंदिर समिती व ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचा सत्कार केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 14/Jan/2025














