कोकणचे बुद्धीवैभव नव्या पिढीने समजून घ्या : प्रकाश देशपांडे

देवरूख : कोकणचे बुद्धीवैभव नव्या पिढीने समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले.

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी चिपळूण येथील प्रकाश देशपांडे यांनी कोकणात जन्मलेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर अलौकिक कार्य केलेल्या लोकोत्तर व्यक्तीत्वांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. बाजीराव पेशव्यांपासून झाशीची राणी, लोकमान्य टिळक, लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सर्वात पहिले शैलचित्रे शोधणारे हरिभाऊ वाकणकर, पहिले वृत्तपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, समतानंद गद्रे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, गोळवलकर गुरुजी, सार्वजनिक काका, कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन, भागोजीशेठ कीर, हमीद दलवाई, पिनकोडद्वारे देशातल्या प्रत्येक गावाला ओळख देणाऱ्या वेलणकर यांच्यापर्यंत अनेक रथी महारथीची त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख ओघवत्या शैलीत करून दिली. कोकणच्या या बुद्धीवैभवातून विद्यार्थ्यांनी स्फूर्ती घ्यावी, असे
प्रतिपादन केले या प्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी कोकणातील या लोकनेत्यांचे कार्य अत्यंत स्फूर्तिदायी आहे. या व्यक्तीमत्वांच्या कार्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी समाज व राष्ट्रोपयोगी कार्य करावे, असा संदेश या प्रसंगी दिला, कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी प्रकाश देशपांडे यांची ओळख करून दिली आणि प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 14/Jan/2025

Arihant 1