झेड मोड बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

श्रीनगर : आता वर्षभर सोनमर्ग, लडाखला जाता येणार असून, ३ तासांचा प्रवास केवळ २० मिनिटांत होणार आहे. हे सर्व जम्मू-काश्मीरच्या सोनमर्ग येथील झेड मोड बोगद्यामुळे शक्य होणार आहे.

या बहुप्रतीक्षित बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंग, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रशासित प्रदेशचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी होणाऱ्या हिमवृष्टीमुळे जवळपास सहा महिने श्रीनगर ते सोनमर्गपर्यंतचा संपर्क तुटतो. मात्र, साडेसहा किलोमीटर झेड मोड बोगद्यामुळे आता वर्षभर संपर्क कायम राहणार आहे. या बोगद्यामुळे गंदरबल जिल्ह्यातील कंगन शहरापर्यंतचा प्रवास केवळ २० मिनिटांत करता येणार आहे. या प्रवासासाठी ३ तास लागत होते.

कुठून कुठे जोडणार?
श्रीनगरच्या लेहला जोडणारा एनएच-१ च्या ६९.५ किमीपासून सुरू होणार आणि ८१.३ किमीवर संपणार. बोगद्याच्या एका बाजूला कंगन भाग, तर दुसऱ्या बाजूला सोनमर्ग आहे. गगनगीर आणि सोममर्गमधील अंतर १२ वरून ६.५ किमी होईल. यासाठी टोल लागणार नाही.

बोगदा का बनविला गेला?
एनएच-१ चा हा भाग हिमवर्षाव होत असताना ६ महिने बंद असतो. त्यामुळे वाहतुकीसाठी हा अतिशय महत्त्वाचा बोगदा ठरणार आहे. या बोगद्यातून ८० किमीच्या वेगाने वाहने धावणार आहेत.
उंची : समुद्रसपाटीपासून ८,६५२ फूट उंचावर
तंत्रज्ञान : न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड
खर्च : २,६८० कोटी रुपये

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:12 14-01-2025