रत्नागिरी : जिल्हयातील प्रत्येक कुटुंबांच्या घरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता सर्व कुटुंबांनी ‘घर तेथे शोषखड्डा’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५३३ गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
आपले गाव स्वच्छ सुंदर असावा यासाठी केंद्र शासनाने ओडीएफ प्लस मॉडेल गाव संकल्पना अंमलात आणलेली आहे. यासाठी वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, शाळांसाठी शौचालय सुविधा व घनकचरा सांडपाणी यांचे व्यवस्थापन प्रत्येक गावामध्ये या सोई-सुविधा असणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सार्वजनिक नॅडेप खतखड्डे, प्लास्टीक कचरा एकत्रित संकलित होण्यासाठी प्लास्टिक केज, गांडूळ खत प्रकल्प अशी स्वच्छता घटकांची कामे प्रत्येक गावांमध्ये करण्यात आली आहेत. गावांमध्ये सार्व. ठिकाणी अस्ताव्यस्त पडणाऱ्या प्लास्टीक कचरा, घनकचऱ्याचे प्रमाण स्वच्छता घटकांच्या उपलब्ध साधनांमुळे कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
सांडपाण्यामुळे वाढणारी रोगराई, डासांचे प्रमाण कमी होण्यासाठी घर तेथे शोषखड्डा मोहीम राबविणेत येत आहे. जिल्हयात एकूण ३. २५ लाख शोषखड्डयांचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. गावस्तरावर उघड्यावरील सांडपाणी यामुळे डास, माशा यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. उघड्यावरील सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण जास्त वाढते. यामुळे मलेरीया, हिवताप, डेंग्यु आजारांचे प्रमाण गावामध्ये होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी गावामध्ये घर तेथे शोषखड्डा ही मोहीम राबविली जात असून घरामधील सांडपाणी शोषखड्ड्यामध्ये मुरल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. तथापि, गावातील विहीरींचे, बोअरवेलचे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील कुटुंबांकडून बांधण्यात येणाऱ्या वैयक्तिक सांडपाणी शोषखड्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रु.७७८/-, मजुरीचे र.रु. १७८२/- असे एकूण रु.२५६०/- इतके अनुदान मिळणार आहे. लाभासाठी लाभाथ्यनि ग्रामपंचायतीमार्फत गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे काम मागणी अर्ज करायचा आहे. त्यासोबत जागेचा उतारा, लाभार्थी प्रवर्ग दाखला, लाभार्थी निवड, ग्रामसभा ठराव सदर काम ग्रामपंचायत कृती आराखड्यात समाविष्ठ असल्याबाबत ग्रामसेवक दाखला, लाभार्थी जॉब कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स सदर कामाचा यापुर्वी लाभ न घेतल्याबाबत दाखला जोडून इ. ग्रामपंचायत अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
घर तेथे शोषखड्डा उद्दिष्ट सर्व तालुक्यांना देण्यात आले असून, त्यानुसार लाभार्थ्यांकडून शोषखड्डयांचे प्रस्ताव तालुकास्तरावर घेण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या घरामध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा नाही त्या कुटुंबाने वैयक्तिक शोषखड्डा मागणी अर्ज आपल्या ग्रामपंचायतीमध्ये करणेसाठी किर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:45 PM 18/Jan/2025
