Maharashtra SIR News: महाराष्ट्रात एसआयआरच्या सर्व्हेसाठी १० दिवसांची मुदतवाढ; मसुदा यादी १७ ऑगस्टला होणार प्रसिद्ध

बीएलओ आता १७ ऑगस्टपर्यंत करणार घरोघरी जाऊन सर्व्हे; प्रमुख शहरांतील अपूर्ण कामामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय


मुंबई / कोकण ब्यूरो:

महाराष्ट्र राज्यभरात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमे अंतर्गत बीएलओ (BLO) मार्फत करण्यात येणाऱ्या घरोघरी पडताळणी सर्व्हेला अखेर निवडणूक आयोगाने आणखी १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत ८ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आली होती, मात्र राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये एसआयआरचे काम अद्याप मोठ्या प्रमाणावर बाकी असल्याने प्रशासन प्रशासकीय पातळीवर १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत घरोघरी सर्व्हेची मोहीम राबवणार आहे. या नवीन मुदतवाढीमुळे संपूर्ण सुधारित वेळापत्रकावर परिणाम झाला असून, आता मसुदा मतदार यादी १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दावे व आक्षेपांचे वेळापत्रकही ढकलले पुढे
नवीनतम मुदतवाढीचा थेट परिणाम पुढील सर्व निवडणूक प्रक्रियांवर झाला आहे. मतदार यादीवर दावे आणि आक्षेप नोंदवण्याचा कालावधी आता १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. प्राप्त झालेले दावे आणि आक्षेपांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाईल. याच कालावधीत मतदार यादीतील विसंगतींविरुद्ध नोटिसा बजावणे आणि त्यावर सुनावणी घेण्याचे कामकाज चालणार आहे.

बीएलओ मार्फत घरोघरी प्रत्यक्ष पडताळणी
नागरिकांच्या नोंदी अचूक व्हाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणेचे बूथ-स्तरीय अधिकारी (BLO) थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. पडताळणीदरम्यान मतदारांना आवश्यकतेनुसार गणना अर्ज भरून देणे आणि त्यासोबत योग्य ती सहाय्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील एसआयआर मोहिमेचे सुधारित वेळापत्रक
टप्पा / कार्यक्रम सुधारित दिनांक / कालावधी
पात्रतेची तारीख १ ऑक्टोबर २०२६
तयारी, प्रशिक्षण आणि छपाई २० जून २०२६ ते २९ जून २०२६
घरभेटी व सर्व्हे (BLO) ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ (सुधारित)
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण (Rationalization) २९ जुलै २०२६
मसुदा मतदार यादी प्रसिद्धी १७ ऑगस्ट २०२६ (सुधारित)
दावे आणि आक्षेप नोंदवण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ ते १६ सप्टेंबर २०२६ (सुधारित)
दावे आणि आक्षेपांचा निपटारा १७ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ (सुधारित)
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ७ ऑक्टोबर २०२६

महाकाय निवडणूक यंत्रणा आणि आकडेवारी
महाराष्ट्रात एसआयआर मोहीम पार पाडण्यासाठी राज्यभरात मोठा प्रशासकीय फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार:

बीएलओ (BLO) संख्या: ९७,९२४

बीएलए (BLA) संख्या: ९६,९४९

एकूण मतदार संख्या: ९,८६,६४,४१३

पूर्वतयारीमुळे कामाला वेग मिळण्याची शक्यता
भारत निवडणूक आयोगाकडून (ECI) एसआयआरची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर बऱ्यापैकी पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली होती. या पूर्वतयारीचा मोठा फायदा आता वाढीव मुदतीत प्रत्यक्ष एसआयआरची उर्वरित कामे वेगाने व बिनचूकपणे पूर्ण करण्यासाठी होणार आहे.

नागरिक व मतदारांना आपल्या नावनोंदणी किंवा बदलांच्या स्थितीची खात्री करण्यासाठी Voter Services Portal किंवा Chief Electoral Officer Maharashtra Portal या अधिकृत संकेतस्थळांवर भेट देण्याचा सल्ला देण्यात येतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 05-08-2026