चिपळूण : नाल्यातील गाळ काढण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण शहरातील ज्या भागात जेसीबी जाऊ शकत नसलेल्या नाले पऱ्हे यातील गाळ मनुष्यबळाचा वापर करुन पावसाळ्यापूर्वी काढण्याबाबत व नाले पन्हे यांची जमीन ताब्यात घेण्यात यावेत, याबाबत नित्यानंद भागवत यांनी चिपळूण न. प. मुख्याधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहे.

या निवेदनानुसार चिपळूण शहरातील नाले पऱ्हे यातील गाळ नगर परिषद प्रशासनाकडून दरवर्षी जेसीबी द्वारे काढला जातो. परंतु, जेसीबी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणचा गाळ गेली अनेक वर्षे काढण्यात आलेला नाही. अनेक वर्षात जेसीबी न जाणाऱ्या ठिकाणचा गाळ न काढल्याने हे नाले पन्हे यांच्या लगत असलेल्या मालमत्तांच्या कंपाऊंडची पातळी ही नाले पन्हे यांच्या पातळीपेक्षा खाली गेली आहे. पर्यायाने अनेक ठिकाणी सांडपाणी तुंबण्याचे प्रकार निर्माण झाले आहेत. तसेच पावसाळ्यात परिसरात पाणी साचून राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

महामार्ग चौपदरीकरण करताना टाकलेले मोऱ्यांचे नवीन पाईप व महामार्ग सर्विस रोडलगतची गटारे देखील गाळाने भरली आहेत. शहरातील नाले पऱ्हे खासगी मालकीचे असल्याने अनेक ठिकाणी जमीन मालकांनी यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती नसताना देखील पाण्याला फुगवटा आल्याने सखल भागात पाणी साचत असते. यावर उपाय म्हणून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाले पऱ्हे यांची जमीन नगर परिषदेने ताब्यात घेऊन, त्याचा योग्य तो मोबदला जमीन मालकांना दिला जाण्याची आवश्यकता आहे. याबाबतचे निवेदेन नित्यानंद भागवत यांनी मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, चिपळूण आदींना दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 17/Jan/2025