इमारत, भिंत अन् दारे जीर्ण; ६ महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्ण हैराण
आरवली (संगमेश्वर): Makhajan PHC News (माखजन प्राथमिक आरोग्य केंद्र समस्या): संगमेश्वर तालुक्यातील माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे (PHC) स्वतःचे “आरोग्य”च सध्या धोक्यात आले आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्याची सहा महिन्यांपूर्वी बदली झाल्यापासून केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. याचा थेट फटका ग्रामीण भागातील रुग्णसेवेला बसत असून नागरिकांना उपचारासाठी दूरवर हेलपाटे मारावे लागत आहेत.
८ महत्त्वाची पदे रिक्त; उपकेंद्रांची अवस्था अधिक बिकट
माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका/परिचर यांची ३ पदे आणि आरोग्य सेवकाचे १ पद रिक्त आहे. तसेच या केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांची अवस्था अधिक बिकट झाली आहे:
- आंबव उपकेंद्र: १ CHO पद रिक्त
- कासे उपकेंद्र: १ आरोग्य सेविका पद रिक्त
- धामापूर उपकेंद्र: १ आरोग्य सेविका पद रिक्त
- शिरंबे उपकेंद्र: १ आशा सेवििकेचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त
कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने लसीकरण, आरोग्य तपासणी आणि माता-बाल संगोपन यांसारख्या मूलभूत आरोग्य सेवांना मोठा फटका बसत आहे.
आरोग्य विभाग गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार?
माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सुमारे १७ गावे आणि १५० वाड्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश गावे दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेली आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिक शेतीच्या कामात व्यस्त असतात. अशा वेळी सर्पदंश किंवा विंचूदंश झाल्यास तत्काळ उपचाराची गरज असते. मात्र, डॉक्टरच उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे.
पायाभूत सुविधा पूर्णपणे ढासळल्या
केवळ मनुष्यबळच नाही, तर आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांचीही मोठी दुरवस्था झाली आहे:
- जीर्ण इमारत: मुख्य इमारतीचे दरवाजे आणि खिडक्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. इमारतीला तातडीने रंगरंगोटीची गरज आहे.
- कंपाउंड वॉल: संरक्षक भिंत कोसळून अनेक वर्षे झाली तरी अद्याप दुरुस्ती झालेली नाही.
- वीज अन् सौर ऊर्जा: सोलर पॅनेल बसवलेले नसल्याने वारंवार वीज गेल्यास अंधाराचा सामना करावा लागतो.
- कर्मचारी निवासस्थान: निवासस्थानाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असून पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
या दुरवस्थेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोग्य प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरून सोयी-सुविधांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 08-08-2026














