Uddhav Thackeray : मला उपदेश द्यायचे, फेसबुकवरून सरकार चालत नाही, मग आता स्वतः..; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीकास्त्र

“आता सिस्टिम अन् सरकार बदलण्याची वेळ आलीय”

मुंबई: Uddhav Thackeray Press Conference (उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद): “मी कोविड काळात जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘फेसबुक लाइव्ह’ (Facebook Live) करायचो, तेव्हा हे लोक मला उपदेश द्यायचे की फेसबुकवरून सरकार चालत नाही. मात्र, आता यांच्यावर मध्यरात्री इन्स्टाग्रामवरून (Instagram) देश चालवण्याची वेळ आली आहे, एवढी यांची अवस्था वाईट झाली आहे,” अशा अत्यंत बोचऱ्या आणि आक्रमक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार प्रहार केला.

दिल्लीत घडलेल्या राजकीय घडामोडी आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

“मोदी नवे ‘स्वामी’ झालेत का?”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच बंडखोर आणि फुटीर खासदारांची भेट घेऊन “भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे,” असे धीर देणारे विधान केले होते. या भेटीचा तीव्र शब्दांत समाचार घेताना ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे स्वामी समर्थ म्हणतात ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, तसे मोदी आता गद्दारांना धीर देत आहेत. मग मोदी आता नवे स्वामी झाले आहेत का? वॉशिंग मशीनमध्ये जाऊनही यांच्यावरचा गद्दारीचा डाग कधीच पुसला जाणार नाही.”

“देशातील तरुण आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, पण पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांना या तरुणांना भेटायला वेळ नाही. मात्र, ‘शाह सेना’ स्थापन करणाऱ्या गद्दारांना भेटण्यासाठी पंतप्रधानांना अजिबात वेळ कमी पडत नाही. बेशरमपणे गद्दारांची भेट घेऊन ‘मी तुझ्या पाठिशी आहे’ असे सांगण्याऐवजी, देशातील तरुणांना ‘फ्रेंड्स’ म्हणून ‘भिऊ नका, मी तुमच्या सोबत आहे’ असे सांगायला हवे होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

“सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे शिंदे गटाला टेन्शन?”

बंडखोर खासदारांसोबतच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेतील वाक्ये मीडियात बाहेर येण्यावर उद्धव ठाकरे यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे शिंदे गट प्रचंड टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्या टेन्शनमध्ये असलेल्यांना धीर देण्यासाठी तर हे वाक्य बाहेर आणले गेले नाही ना? हा संदेश नक्की कोणाला दिला जात आहे—कोर्टाला, अमित शाहांना की देवेंद्र फडणवीसांना?” असा सवाल त्यांनी विचारला.

“काँग्रेसने आपल्या कार्यकाळात एवढ्या शिव्या कधी खाल्ल्या नसतील, जेवढ्या आज मोदी आणि अमित शाह यांच्या वाट्याला येत आहेत. आमचे खासदार फोडून महिना झाला असून लोकसभा अध्यक्षांनी पक्षपाती निर्णय दिला आहे. मात्र, जनता आणि देशातील तरुण हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत,” असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 08-08-2026