PM Modi at IIT Delhi Convocation: “जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा तेव्हा आव्हाने निर्माण होतात आणि संधीही” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

“तुम्ही फक्त पदवी नाही तर स्वप्न घेऊन जात आहात” आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

नवी दिल्ली: PM Modi at IIT Delhi Convocation (पंतप्रधान मोदी आयआयटी दिल्ली दीक्षांत समारंभ): देश-विदेशात तंत्रज्ञान आणि संशोधनाचा डंका वाजवणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीच्या दीक्षांत समारंभात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या सोहळ्यात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी जागतिक आव्हाने, वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधींवर महत्त्वपूर्ण भाष्य केले.

“तुम्ही या संस्थेतून केवळ पदवी घेऊन जात नसून मोठी स्वप्ने घेऊन जात आहात. या प्रवासात जो परिवर्तन स्वीकारतो आणि जो सातत्याने शिकत राहतो, त्याचाच विजय होतो; म्हणजेच ‘जो शिकेल, तोच जिंकेल’,” असा मूलमंत्र पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

“परिवर्तन अन् आव्हानांना संधीत बदला”

जागतिक घडामोडी आणि तंत्रज्ञानाच्या वेगावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले, “जगात आज अत्यंत वेगाने बदल होत आहेत. जगातील स्ट्रॅटेजिक इक्वेशन (सामरिक समीकरणे) बदलत असून ग्लोबल पॉवर बॅलन्स प्रत्येक क्षणी बदलत आहे. या सर्व बदलांमागे तंत्रज्ञानाचा वेग ही सर्वात मोठी ताकद आहे.”

येत्या २० ते ३० वर्षांत जग कसे असेल हे आज सांगणे कठीण असले, तरी जेव्हा जेव्हा मोठे बदल होतात तेव्हा नवीन आव्हाने निर्माण होतात आणि त्यासोबतच नव्या संधीही निर्माण होतात. जो या आव्हानांवर मात करून नवीन पर्याय शोधेल, त्याच्यासाठी ही आव्हानेच संधी बनतील आणि हेच शिक्षण तुम्ही आयआयटी दिल्लीतून घेतले आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

“कॅम्पस लाईफ अन् शिक्षकांप्रती कृतज्ञ राहा”

विद्यार्थ्यांना भावूक वातावरणात मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, “मित्रांनो, जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला मागे वळून पाहण्याची संधी देईल, तेव्हा हे लक्षात ठेवा की हे कॅम्पस लाईफ, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ हे तुमचे कुटुंब बनले आहे. तुमच्या प्राध्यापकांनी तुमच्या भविष्याला आणि विचारांना आकार दिला आहे.”

“येथे आलेला तुमचा पहिला दिवस आठवा आणि आजचा दिवस आठवा. तुमच्या प्रत्येक यशात या सर्वांची आठवण ठेवा आणि त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा. या आठवणी व नातेसंबंध ‘असेट’ (मालमत्ता) म्हणून सोबत घेऊन जा, कधीही विसरू नका. इथून निघताना एकमेकांना आवर्जून भेटा आणि कुठेही राहिलात तरी हे नाते आयुष्यभरासाठी कायम ठेवण्याचा प्रयत्न करा,” असा आपुलकीचा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी पदवीधरांना दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 08-08-2026