साडवली : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी पर्यटनमंत्री एक शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या चर्चेत मार्लेश्वर परिसराच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली.
उंच डोंगरावर वसलेले श्री मार्लेश्वर हे श्रीशंकराचे जागृत देवस्थान आहे. सह्याद्री पर्वतरांगा, वर्षभर वाहणारे धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे भाविकांसाठी हे ठिकाण धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. दरवर्षी महाराष्ट्रभरातून हजारो पर्यटक आणि भाविक येथे येतात. मार्लेश्वर परिसरात आवश्यक पर्यटन सुविधा, सुशोभीकरण, पार्किंग व्यवस्था, रस्तेविकास, स्वच्छतागृहे, वीज व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या कारणांमुळे भाविक व पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आमदार निकम यांनी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. या निधीतून मंदिर परिसराचा विकास, धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक सुविधा, निसर्ग पर्यटनासाठी विशेष जोतींची उभारणी व पर्यटकांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबवता येतील.
पर्यटनमंत्री देसाई यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी श्रीक्षेत्र मार्लेश्वर भेट देण्याची तयारीही दर्शवली आहे. श्रीक्षेत्र मार्लेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर होणारा निधी फक्त धार्मिक पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक रोजगार निर्मितीलाही चालना देणार आहे. परिसरातील युवा व उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. आमदार निकम यांच्या प्रयत्नांनी चिपळूण-संगमेश्वर भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. कोकण पर्यटनाच्या विकासासाठी निधी उपयोगात आणून स्थानिक पातळीवर बदल घडवणे हाच उद्देश आहे, असे निकम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 17/Jan/2025














