सावर्डे : दहावी परीक्षेत गुणवत्तेत येण्यासाठी माझ्या शिक्षकांनी मला कॉपी पुरवली; मात्र तिचा वापर न करता मी मराठवाडा विभागात गुणवत्ता यादीत नववा आलो. तेव्हा दुसऱ्याचे ज्ञान माणसाला कधीच मोठे करत नाही. आयुष्यात जे आपले आहे त्यामध्येच समाधान मानायला शिका. तुमच्याकडे मेंदू आहे त्याला जपा, त्याला खतपाणी घाला तुम्ही नक्की मोठे व्हाल, असा सल्ला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी समस्त श्रोतेवर्गाला दिला.
सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेचे संस्थापक स्व. गोविंदराव निकम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त महोत्सव सोहळ्यात “मी कसा घडलो” या विषयावर ते बोलत होते. या वेळी प्रसिद्ध उद्योजक मंदार भारदे, संस्थाध्यक्ष बाबासाहेब भुवड, आमदार शेखर निकम, प्रशांत निकम, सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, प्रकाश राजेशिर्के, आलिवर मचैंड, संस्था सचिव महेश महाडिक, अनिरूद्ध निकम, डीवायएसपी राजेंद्र राजमाने, पोलिस उपनिरीक्षक जयंत गायकवाड उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणमहीं गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्काराने गोवळकोट येथील राजे सामाजिक प्रतिष्ठानला सन्मानित करण्यात आले. पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र संस्थेचे विशाल राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला. संस्थेच्या वतीने आमदार शेखर निकम यांचा सत्कार अध्यक्ष भुवड यांच्या हस्ते करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त मान्यवर
सचिन शेंबेकर, नीलेश घाग, नेहा बागवे, विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवीप्राप्त नमिता बोंडे, हरिश्चंद्र भागडे, ऑस्ट्रेलियात कृषी क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले अनिरूद्ध निकम, सुवर्णपदक प्राप्त सेजल शिंदे, शिल्पकलेत प्रथम क्रमांक प्राप्त विशाल गोवळकर, विशेष पुरस्कार प्राप्त विशाल म्हसणे, तनवी सुर्वे, रूपाली पटेल उदयराज गराडे, गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची नॅशनल अॅबॅकसमध्ये एक लाख रुपयेची विजेती गार्गी घडशी, नॅशनल रायफल शूटिंग यश प्राप्त यश सावंत, राज्य धावणे स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनी हमेरा सय्यद, राज्य कबड्डी संघात सहभागी शुभम नवरंग.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 17/Jan/2025














