चिपळूण : शहरातील माधव सभागृहात रत्नसिंधू सायकल संमेलन पार पडले. या संमेलनात जिल्ह्यातील सायकलस्वारांसह मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील १५० सायकलस्वारांनी सहभाग दर्शवला. यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सायकल गौरव पुरस्कार’ रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकलिस्ट अमित कवितके यांना त्यांच्या सायकलिंगमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला.
जिल्हा सायकल संमेलन गेल्या चार वर्षांपासून होत आहे. यावर्षी चिपळूण सायकलिंग क्लबकडे यजमानपद होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, खेड सायकलिंग क्लब, दापोली सायकलिंग क्लब, सिंधुदुर्ग, कनक रायडर्स क्लब सोबतच डोंबिवली, महाड, सांगली, सातारा, कराड, विटा, उंब्रज व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १५० सायकलप्रेमी सहभागी झाले होते.
चिपळुणातील नृत्यमल्हार अॅकॅडमीच्या संचालिका स्कंधा चितळे आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याद्वारे ईशवंदना सादर करून संमेलनाची सुरुवात केली. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विनायक वैद्य यांनी मार्गदर्शन केले, डोंबिवली सायकलिंग क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी दोन दिवस सायकल संमेलन राबवण्याची संकल्पना मांडली. अमॅच्युअर सायकलिस्ट ते अल्ट्रा सायकलिस्ट हा पुण्याच्या किरोट कोकजे यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमधून सांगितलेला किस्सा श्वास रोखून धरणारा प्रवास प्रेक्षकांना निःशब्द करून गेला.
आहारतज्ज्ञ आणि अल्ट्रा सायकलिस्ट प्रीती गुप्ता, अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. आदित्य पोंक्षे, स्ट्रेन्थ ट्रेनर कॉम्पिटिटिव्ह, सिद्धार्थ गाडेकर यांच्यातील न्युट्रिशन, हायड्रेशन, हार्टीट मॉनिटरिंग आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग व रेस प्रिपरेशन यावर आयोजित परिसंवादातून सर्व सायकलिस्टना अतिशय उपयुक्त माहिती मिळाली, तसेच दीर्घकाळापासून आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सायकलला वाहतुकीचे साधन म्हणून उपयोग करणाऱ्या चिपळूण परिसरातील दहा ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ज्योती परांजपे लिखित ‘मंतरलेले १४ दिवस’ या त्यांच्या पुणे ते अयोध्या सायकल प्रवासावर आधारित पुस्तकाचे त्यांचे सहप्रवासी डॉ. अश्विनी गणपत्ये व रमा करमरकर यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दाभोळकर ठरले ‘सायकल सम्राट’
या संमेलनात विशेष गौरव पुरस्काराने दापोली सायकलिंग क्लबचे अंवरिश गुरव, तर चिपळूण सायकलिंग क्लबचे अहमदअली शेख व डॉ. मनीषा वाघमारे यांना गौरवण्यात आले. सर्वांत जास्त अंतराचे सायकलिंग करणाऱ्या मेल रायडर प्रशांत दाभोळकर यांना सायकल सम्राट, तर फिमेल रायडर डॉ. मनीषा वाघमारे यांना सायकल सम्राज्ञी या पुरस्काराने गौरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 17/Jan/2025














